गटई कामगार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 

गटई कामगार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 

            भंडारा, दि.10 : गटई कामगारांसाठी गटई कामगार योजना सुरु करण्यात आलेली आहे. चामडयाच्या वस्तु व पादत्राणे दुरुस्तीचा व्यवसाय करणारे गटई कामगार हे रस्त्याच्या कडेला उन्हापावसात बसून आपला व्यवसाय करत असतात. गटई कामगारांना उन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावा याकरीता 100 टक्के शासकीय अनुदानातून गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

           अर्जदाराचा स्वतःचा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला. चालू वर्षातील प्राधिकृत अधिकाऱ्याने  दिलेला उत्पन्नाचा दाखला. (तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र) शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्डाची झेरॉक्स प्रत, अधार कार्ड झेरॉक्स प्रत, अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत आहे ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका व छावणी क्षेत्र (कन्टॉटमेंट बोर्ड) यांनी भाड्याने, खरेदीने, स्वमालकीची असल्याबाबतचे भाडेचिठ्ठी कराराची प्रत किंवा खरेदी क्षेत्राची साक्षांकीत प्रत.

            योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय योजना (www.mahabanygov.in) या वेबसाईटवर ऑनलाईन प्रणालित अर्ज भरून त्याची एक प्रत समाज कल्याण कार्यालयात सादर करावी. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हिल लाइन्स ,भंडारा येथे संपर्क साधावा.