महागाईने होरपळणाऱ्या जनतेसाठी शासनाकडून ठोस उपाययोजना नाही

महागाईने होरपळणाऱ्या जनतेसाठी शासनाकडून ठोस उपाययोजना नाही

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची खरमरीत टीका

बेरोजगारी दूर करावी
खारपाण पट्ट्यासाठी महामंडळाची स्थापना करून अकोला येथे मुख्यालय करावे
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प मार्गी लावावा*
नागपूरमध्ये आयटी हब करावे

विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी वडेट्टीवार यांनी केल्या मागण्या

नागपूर, १९ – राज्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल, गॅस, वीज, डिझेल, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सिलेंडर चारशे रुपयांवरून हजार रुपयांवर गेला आहे. तरीही सरकारकडून कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी खरमरीत टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

नियम २९३ अन्वये मांडण्यात आलेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान ते विधानसभेत बोलत होते. विदर्भाचा अनुशेष भरून काढला पाहिजे. विदर्भात आयटी हब झाले पाहिजे. वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प पूर्ण केला पाहिजे, खारपाण पट्ट्याच्या विकासासाठी खारपाण पट्टा विकास महामंडळाची स्थापना करून त्याचे मुख्यालय अकोला येथे करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, महागाईत होरपळल्याने सामान्य माणसांच बजेट कोलमडले आहे. चारशे रुपयाचा सिलेंडर असताना तो डोक्यावर घेऊन नाचणारे आता हजार रुपये सिलेंडर झालेला असताना तोंडातून शब्द काढत नाहीत. राज्यातील जनता महागाईने होरपळत असून त्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना केली गेली नाही.
या शासनाचं राज्यातील जनतेकडे लक्ष आहे का ? असा सवाल उपस्थित करत राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे रुपये सबसिडीचा निर्णय घेतला. उज्वलाच्या सबसीडीसंदर्भात राज्याने देखील वाटा उचलावा. त्यामुळे गरिबांचे अश्रू पुसले जातील असे श्री. वडेट्टीवार म्हणाले. सत्तेवर आल्यावर महागाई चुटकीसरशी कमी करू असा तुम्ही दिलासा दिला होता. मात्र लोकांची फसवणूक झाली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, जंगल आणि खनिज संपत्ती विपुल प्रमाणात असतानाही विदर्भ विकासात मागे पडतो आहे. याला सरकारचे धोरण जबाबदार आहे. विदर्भातील युवकांच्या हाताला काम मिळत नाही. विदर्भात केवळ सात टक्के रोजगार कारखान्यातून रोजगार मिळतो. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील कमी होत नाहीत, असे सांगून खारपाण पट्ट्याच्या विकासासाठी खारपाण पट्टा विकास महामंडळाची स्थापना करून त्याचे मुख्यालय अकोला येथे करावे अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी केली. यामुळे खारपाण पट्ट्यातील जमिनींचा कायमचा प्रश्न सुटू शकेल, असेही श्री. वडेट्टीवार म्हणाले.

विदर्भातील वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प पूर्ण केला पाहिजे. त्यातून विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. यासाठी सरकारने कृष्णा खोरे महामंडळाच्या धर्तीवर निर्णय घ्यावा आणि हा प्रकल्प पूर्ण करावा. वन्य प्राणी आणि मानवाचा संघर्ष वाढला आहे. जंगलात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्राणी मनुष्य वस्तीत येत आहेत. हे प्राणी पाण्यासाठी भटकत असताना गाडीखाली आल्याने त्यांचा मृत्यू होतो. आतापर्यंत जवळपास 42 वाघ मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत. त्याचबरोरर डुक्कर आणि हत्तींचा शेतकऱ्यांना त्रास होत असून त्याचा देखील सरकारने बंदोबस्त करावा. चंद्रपूर येथील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजे. मालगुजारी तलाव म्हणजेच मामा तलाव ही विदर्भाला मिळालेली देणगी आहे, या मालगुजारी तलावांचा पाणी साठा वाढविणे, गाळ काढणे, डागडुजी करणे आदि कामे सरकारने प्राधान्याने मार्गी लावावीत. हे तलाव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे आहेत, असे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

यावेळी श्री. वडेट्टीवार यांनी आरोग्य यंत्रणा आणि मुंबई महानगर पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. आरोग्य विभागात बदल्यांचा भ्रष्टाचार आहे, अशा शब्दात त्यांनी सडकून टिका केली. नागपूर उपसंचालकाच्या बदलीत देवाणघेवाण झाली. अनेक बदल्या नियमबाह्य केल्या. आरोग्य यंत्रणा लोकांचा जीव वाचवण्यासाठी आहे की लोकांना वाऱ्यावर सोडण्यासाठी असा सवाल त्यांनी केला. कंत्राटी भरती करून सरकार आरक्षण मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. लाखो तरूण नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु सरकारला त्याचे काही देणे घेणे नसल्याची टीका श्री. वडेट्टीवार यांनी केली.