गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस भरतीपूर्व व चारचाकी वाहनचालक प्रशिक्षणार्थ्यांचा…

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस भरतीपूर्व व चारचाकी वाहनचालक प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

• पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणामध्ये १५० तर ड्रायव्हिंग प्रशिक्षणात ११० प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग

गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त व दुर्गम अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगार प्राप्त व्हावा व त्यातुनच त्यांची आर्थिक समृध्दी व्हावी तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देवून त्यांना नोकरी मिळविणेकरीता आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीपूर्व व चारचाकी वाहनचालक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आज दि. १८/१२/२०२३ रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे पार पडला.

गडचिरोली पोलीस दलामार्फत दिनांक २०/११/२०२३ ते १८/१२/२०२३ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील बेरोजगारांकरीता चारचाकी वाहन चालक तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. चारचाकी वाहन प्रशिक्षणामध्ये एकुण ११० प्रशिक्षणार्थी सहभाग झाले होते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देऊन त्यांना लर्निंग लायसन्स काढुन देण्यात आले असून पर्मनंट लायसन्सही काढून दिले जाणार आहे. सन २०२१ पासून गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन ६७६ युवक, २० युवती व १२ आत्मसमर्पीत नक्षल सदस्य असे एकुण ७०८ उमेदवारांना चारचाकी वाहन ड्रायव्हिंग प्रशिक्षण देवुन परमनंट लायसन्स काढुन देण्यात आले आहे. यासोबतच दि. २०/११/२०२३ ते दि. १८/१२/२०२३ पर्यंत आयोजीत निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात गडचिरोली जिल्ह्यातील विविध उपविभागातून एकुण १५० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या १५० प्रशिक्षणार्थ्यांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने मैदानी चाचणी व लेखी परीक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आतापर्यंत घेण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रहीवासी असलेल्या एकुण १०६२ युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदवला असून, प्रशिक्षणा दरम्यान सर्व उमेदवारांना गडचिरोली पोलीस दलाचे वतीने प्रशिक्षणाकरीता शुज, टि-शर्ट, लोअर, पुस्तके, नोटबुक्स, नोटपॅड व पेन इत्यादी साहित्य मोफत वितरीत करण्यात आले. या समारोपीय कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. म्हणाले की, यापुढे ही प्रशिक्षणार्थ्यांनी नोकरी लागेपर्यंत अभ्यास आणि व्यायामात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. स्वतःसोबत स्पर्धा करुनच स्वतःला सिद्ध करा. नोकरी लावण्याच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका. मेडीएटरवर नाही तर मेरीटवर विश्वास ठेवा, असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आंतरवर्ग शिक्षक श्री. स्वप्निल मडावी, श्री. नितिन मेडपल्लीवार व श्री. पुष्पक सेलोकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता गडचिरोली जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमकें त्याचप्रमाणे नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परीश्रम घेतले व कार्यक्रमाचे आभार पोउपनि. भारत निकाळजे यांनी मानले.