शेतकऱ्यांनो…कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे करा व्यवस्थापन

शेतकऱ्यांनो…कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे करा व्यवस्थापन

चंद्रपूर, दि. 13: जिल्ह्यामध्ये कापूस पिकाचे 1 लक्ष 69 हजार 936 हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अल्प प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. कोरपना तालुक्यातील दहेगाव, चिमुर तालुक्यातील सावरी व गैरखेडा, वरोरा तालुक्यातील माढेळी या ठिकाणी गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसानीची पातळी जवळपास आढळून आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे निरीक्षण करून गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन वेळीच नियंत्रण केल्यास प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात येईल.

असे करा गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन :

गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवडयाला एकरी शेताचे प्रतिनिधीत्व करतील अशी 20 झाडे निवडावी. निवडलेल्या झाडावरील फुले, पात्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंडअळी ग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी. प्रादुर्भाव ग्रस्ताची टक्केवारी 5 टक्केपेक्षा जास्त आढळल्यास रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. फुलामध्ये प्रादुर्भाव 5 टक्केपर्यंत आढळून आल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली / 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

प्रादुर्भाव 5 ते 10 टक्के आढळून आल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा   क्लोरपायरीफॉस 25 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के 30 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के 10 मिली किंवा  डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के 10 मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी  करावी.

जेथे प्रादुर्भाव 10 टक्के च्यावर आहे, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्यामध्ये क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 टक्के  + लॅब्डासायहॅलोथ्रीन 4.6 टक्के 5 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के + अॅसीटामिप्रीड 7.7 टक्के 10 मिली.

जिनिंग/प्रेसिंग मिल्स, व्यवस्थापक यांनी त्याच्या क्षेत्रामध्ये कापूस खरेदी केंद्रे, गोडाऊन या ठिकाणी प्रकाश  सापळे/फेरोमन सापळे लावावे. अडकलेले पतंग नियमित गोळा करून नष्ट करावे. फेरोमेन सापळयातील ल्युर्स वेळोवेळी बदलणे तसेच कापसापासून निर्माण झालेला कचरा, सरकीतील अळया व कोष नष्ट करून परिसर  स्वच्छ ठेवणे. याप्रमाणे शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.