कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासुन संरक्षण तक्रार समिती स्थापन
गडचिरोली, दि.08: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ व नियम दि. ९/१२/२०१३ तसेच महिला व बाल विकास विभाग शासान निर्णय क्रं.मकचौ २०१३/प्र.क्र.६३/मकक- दि.१९-६-२०१४ आणि महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रं.मकची-२०१४/प्र.क्र.६३/मकक-दि.११-९-२०१४ प्रमाणे कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय, अशासकीय, खाजगी कार्यालय, उदयोगधंदे, दुकाने, कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे हे अधिनियमानुसार अनिवार्य आहे.सर्व कामाच्या ठिकाणी जिथे १० किंवा १० पेक्षा जास्त (महिला आणि पुरुष) कर्मचारी कार्यरत असेल त्या सर्व कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे आवश्यक आहे. जिथे १० पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत किंवा ज्यांची मालका विरुध्द तक्रार आहे आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचारी महिला हया लैगिक छळाच्या तक्रारी जिल्हास्तरावर स्थापित स्थानिक तक्रार समिती कडे करु शकतात. मा. निवासी उपजिल्हाधिकारी हे या कायदया अंतर्गत जिल्हा अधिकारी म्हणून घोषित आहेत. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे समितीचे पदसिध्द सदस्य आहेत. ज्या महिला सरळ स्थानिक तक्रार समितीकडे पोहचू शकत नाहीत ते समितीचे समन्वय अधिकारी – बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) संबंधित तालुका करिता तसेच शहरी भागाकरिता बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) ) मार्फत स्थानिक तक्रार समिती – जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गडचिरोली यांचे कडे तक्रार करु शकतात. अधिक माहिती करिता जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गडचिरोली, बॅरेक क्रं.१, म्पलेक्स एरिया गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा.