महाराष्ट्र स्टूडंट इनोव्हेशन चॅलेंज अंतर्गत जिल्हास्तरीय सादरीकरण सत्र संपन्न

महाराष्ट्र स्टूडंट इनोव्हेशन चॅलेंज अंतर्गत जिल्हास्तरीय सादरीकरण सत्र संपन्न

भंडारा,दि. 07 : महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्टूडंट इनोव्हेशन चॅलेंज या उपक्रमाअंतर्गत आज जे.एम.पटेल महाविद्यालय भंडारा या ठिकाणी जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले.

 राज्यातील विद्यार्थ्याच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे मुख्य उदिष्ट आहे. महाराष्ट्र स्टूडंट इनोव्हेशन चॅलेंज ही स्पर्धा हि तीन टप्प्यामध्ये पार पडली. पहिल्या टप्प्यात जिल्हयातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रचार,प्रसार व विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी  आवाहन करणे, स्पर्धेचा दुसरा टप्पा शैक्षणिक संस्था स्तरावर विद्यार्थ्याच्या कल्पनांचे सादरीकरण व तिसरा टप्पा जिल्हास्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट कल्पनांचे सादरीकरण करून नवकल्पना निवडणे असा आहे.

जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राकरीता प्रमूख अतिथी म्हणून जे.व्ही.निंबार्ते प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलांची भंडारा व डॉ.कार्तिक पन्नीकर, आयक्यूएसी समन्वयक जे.एम.पटेल महाविद्यालय भंडारा हे मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे ज्यूरी सदस्य म्हणून डॉ.शाहीद अख्तर शेख मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ.प्रशांत माणूसमारे जे.एम.पटेल महाविद्यालय आणि नुतन सारवे, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समिती हे उपस्थित होते.

यावेळी एकूण 43 विद्यार्थी उपस्थित होते. शैक्षणिक संस्था स्तरावरून जिल्हयातील एकूण 10 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड झाली होती. त्याअनूषंगाने, जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी एक ज्युरी पॅनल तयार करण्यात आले होते. त्यांचेसमक्ष सदर विद्यार्थ्यांनी त्यांचे पीपीटी/मॉडेल द्वारे सादरीकरण केले.

सादरीकरण सत्राच्या उदघाटनीय कार्यक्रमात जे.व्ही.निंबार्ते प्राचार्य यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थीही नवकल्पना सत्यात उतरवून मोठे उद्योजक बनू शकतात. याबाबत उमेदवारांना मार्गदर्शन केले. डॉ.कार्तिक पन्नीकर, आयक्यूएसी समन्वयक यांनी आपण रोजगार घेणारे न बनता रोजगार देणारे बनले पाहिजे. सद्यस्थितीत शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले असून विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळले पाहीजे. असा मुलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.