जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये जिल्ह्यातील 236 गावे

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये जिल्ह्यातील 236 गावे

चंद्रपूर,दि.04:  राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील 236 गावांची निवड झाली असून अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज आढावा बैठक घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो) अजय चरडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा जलसंधारण अधिकारी निलीमा मंडीपे, राजुराचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी पोहन बलकी यांच्यासह दूर दृश्य प्रणालीद्वारे संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान 2.0 साठी तालुकानिहाय 236 गावांची निवड करण्यात आली असून विभागानुसार कृती आराखडे तयार करण्यात आले आहे. त्यामुळे विभागनिहाय यंत्रणांनी प्रत्येक कामाचा तालुकानिहाय नियमित आढावा घ्यावा. योजनानिहाय अंदाजपत्रके तयार करावीत. उपलब्ध निधी नुसार संबंधित कामाचे विभाजन करावे. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांनी यंत्रणा निहाय असलेच्या कामांची माहिती घ्यावी. तसेच विभागांनी तयार केलेले कृती आराखडे तपासून घ्यावे. त्यासोबतच कामाकरीता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी यंत्रणांच्या आराखडयाबाबत माहिती व कृषी, जलसंधारण, वनविभाग व जिल्हा परिषद जलसंधारण विभागामार्फत असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली.