राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करा

राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करा
आमदार सुधाकर अडबाले यांची मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मागणी

गडचिरोली : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करा, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १०, २०, ३० वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभ मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांमार्फत मागणी होत आहे. मागणीच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व इतर अनेक संघटनांनी आंदोलनाद्वारे वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. मात्र, अद्यापही सरकारकडून शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने सकारात्मक पाऊल उचलण्यात आलेले नाही. यामुळे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झालेली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्‍यातील इतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो आहे. त्‍याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय, खासगी अनुदानित, आश्रम शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थामधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करावी, यासाठी गेल्‍या दोन अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्‍नांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. राज्‍य सरकारने राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रास्‍त मागणी असलेली १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.