कुणबी नोंदी सादर  करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात  विशेष कक्षात नोंदी तपासणे सुरू

कुणबी नोंदी सादर  करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात  विशेष कक्षात नोंदी तपासणे सुरू

शासन निर्णयानुसार  नोंदी तपासून सादर करा जिल्हाधिकारी

           भंडारा दि.7 : कुणबी नोंदीचे अभिलेख सादर करण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे  विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यात कुणबी नोंदी असलेले अभिलेख तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे . काल जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत सर्व संबधित यंत्रणांची आढावा बैठक घेतली.त्यामधे उपलब्ध अभिलेख तपासून त्यातील कुणबी नोंदी तपासण्याचे निर्देश त्यांनी दिले .सन 1967 पूर्वीचे अभिलेख तपासण्याच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही याबाबत चर्चा करण्यात आली.

        भंडारा जिल्ह्यासाठी भूसंपादन अधिकारी आकाश अवतारे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

       साकोली, मोहाडी,तुमसर,लाखनी सह सर्व तहसील कार्यालयामध्ये आजपासून या अभिलेखांची पडताळणी सुरू असून कुणबी नोंदीची शोध मोहीम सुरू आहे.

        मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यपद्धती विहीत करण्यासाठी मा.न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाजातील व्यक्तींकडे असलेल्या कुणबी नोंदीचे अभिलेख जमा करण्यासंदर्भात  कार्यवाही सुरू आहे .

        ज्या मराठा व्यक्तींकडे कुणबी नोंदी असतील त्यांनी संबंधित जिल्हा समन्वय अधिकारी किंवा विशेष कक्षाकडे कार्यालयीन वेळेत असे अभिलेख सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.