जिवती तालुक्यात “लिडकॉम आपल्या दारी” कार्यक्रम

जिवती तालुक्यात लिडकॉम आपल्या दारी कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 20 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, चंद्रपूरच्या वतीने जिवती तालुक्यातील चिखली व मोहदा येथे लिडकॉम आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कल्पना भंगाळे यांच्यासह पांडुरंग कांबळे, सतिश कांबळे, सुग्रीव सुरनर, मधुकर येरेवाड, मालोजी वाघमारे तसेच मोठ्या संख्येने चर्मकार बांधव उपस्थित होते.

शासन आपल्या दारी” या संकल्पनेतून महामंडळातर्फे “लिडकॉम आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून जास्तीत जास्त चर्मकार बांधवांपर्यंत महामंडळाच्या योजना पोहोचाव्यात या उद्देशाने, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनानुसार लिडकॉम आपल्या दारी या मेळावा कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे.

चिखली व मोहदा येथे झालेल्या मेळाव्याला महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कल्पना भंगाळे यांनी उपस्थित चर्मकार बांधवांना मार्गदर्शन केले. त्यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित बांधवांना दिली. सोबतच चर्मकार समाज व्यवसायात येऊन चर्मकार समाजातून यशस्वी व्यावसायिक घडावेत यासाठी महामंडळ नेहमी प्रयत्नशील आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तसेच चर्मकार बांधवानी पारंपारीक व्यवसायासोबतच काळाच्या गरजेनुसार इतरही नवीन व्यवसाय करावे आणि व्यवसायासाठी लागणारे भांडवल संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाद्वारे दिल्या जाईल. असे सुरज दहागांवकर यांनी प्रास्ताविकेतून स्पष्ट केले.