भंडारा जिल्ह्यात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

 जिल्ह्यात 8 ठिकाणी साकारणार प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी ऑनलाईन उद्घाटन

जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

         भंडारा, दि. 17: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणाऱ्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम येत्या 19 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कौशल्य, उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला.

जिल्हाधिका-यांनी आज सकाळी घेतलेल्या बैठकीत आयोजनाच्या पुर्वतयारीचा आढावा घेतला. या आयोजन समितीचे सदस्य सचिव सुधाकर झळके सहायक आयुक्त कौशल्य विकास हे आहेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यात 511 कौशल्य विकास केंद्रांची स्थापना होणार आहे. या केंद्राचा उद्घाटन सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार, दि. 19 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4.00 वा. ऑनलाईन माध्यमाद्वारे होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण भंडारा जिल्ह्यातील आठ केंद्रांमध्ये दाखविण्यात येणार आहे.     

            यासंदर्भात काल मुख्यमंत्री श्री.शिंदे व मंत्री श्री. लोढा यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला.   जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुधाकर झळके आदी उपस्थित होते.

            जिल्ह्यात गणेशपूर येथील मंगलम सभागृह,नागपूर रोड, ठाणा येथील  श्रीराम हॉल,सपाटे भवन ,नागपूर रोड,दिघोरी मोठी येथील  लांखादूर तालुक्यातील सिध्दीदाता  हनुमान मंदीर,मोठी दिघोरी,पवनी तालुक्यातील अडयाळ येथील गणेश सभागृह,पवनी रोड ,अडयाळ येथे तर लाखनी तालुक्यातील स्वप्नदिप सेलीब्रेशन हॉल, साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा येथील भारत सभागृह, नागझिरा रोड  तर तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील गणेश लॉन्स, तर मोहाडी तालुक्यातील वरठी चंद्रजगत कॉन्हेंहडट, स्टेशन रोड  या ठिकाणी प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचा कार्यक्रम होणार आहे.

        प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. महाराष्ट्राच्या या अभिनव संकल्पनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, ही बाब देखील गौरवाची आहे. त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या सूचनांप्रमाणे भंडारा जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.