“उमेद अभियानाच्या” सिंदेवाही कार्यालयाला अभय कुणाचे ?

“उमेद अभियानाच्या” सिंदेवाही कार्यालयाला अभय कुणाचे ?

◾ वासेरा येथील आय सिआरपी पद भरती प्रकरणात अनागोंदी
◾ प्रोसेडिंग बुकातील ठराव गायब करणारे अजूनही मोकळेच.

सिंदेवाही :- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील आय सिआरपी पद भरती प्रक्रियेत तालुका अभियान कार्यालयातून अनागोंदी कारभार करून अनुभवी व्यक्तीची निवड झाल्यावर सुद्धा ती निवड रद्द करून विना अनुभवी व्यक्तीची आय सिआरपी पदी निवड केली. त्याबाबतची तक्रार तालुका अभियान व्यवस्थापक तथा जिल्हा अभियान व्यवस्थापक यांचे कडे करण्यात आली असताना सुद्धा सदर प्रकरणाची चौकशी थांबविण्यात आली असल्याने उमेद अभियान तालुका कार्यालयाला अभय कुणाचे ? सदर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोण पाठीशी घालत आहे ? असा प्रश्न वासेरा येथील बचत गटातील महिला विचारत आहेत.
मागील अनेक दिवसापासून वासेरा येथील आय सिआरपी चे दोन्ही पदे रिक्त असताना अभियानाचे काम मंदावले होते. त्यामुळे १० ऑगस्ट २०२२ रोजी ग्राम पंचायत कार्यालय येथे महिला ग्रामसंघाची बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये अभियानाचा अनुभव असलेल्या गावातील दोन महिलांची आय सिआरपी म्हणून निवड करण्यात आली. मात्र ग्रामसंघाच्या अध्यक्षा नीलिमा कोवले यांचेसह तालुका अभियान कार्यालयातील प्रभाग समन्वयक आशिष दरडे यांनी काही दिवसांनी मीना बोरकर या व्यक्तींची निवड रद्द केली. आणि त्या ऐवजी अभियानाचा अनुभव नसलेली दुसऱ्या व्यक्तीची आय सिआरपी म्हणून निवड केली. याबाबत मीना बोरकर यांनी तालुका अभियान व्यवस्थापक यांचेकडे तक्रार दाखल केली. मात्र याबाबतच्या चौकशीला येण्यापूर्वीच तालुका अभियान व्यवस्थापक विवेक नागरे, तालुका व्यवस्थापक उद्धव मडावी, आणि दिनेश जांभूळकर हे तिघेही सुट्टीच्या दिवशी वासेरा येथे आले. आणि ग्रामसंघाच्या कार्यालयात न जाता सखी ग्रामसंघाच्या अध्यक्षा नीलिमा कोवले यांचे घरी बसून ग्राम संघाचे प्रोसेडिंग बुकातील मीना बोरकर यांचा निवडी बाबतचा लिहलेला ठराव फाडून त्या ऐवजी दुसरा ठराव लीहण्यात आला. असा आरोप तक्रारदार मीना बोरकर यांनी करून याबाबतची तक्रार जिल्हा अभियान व्यवस्थापक यांचेकडे केली आहे. परंतु याबाबतची चौकशी अजूनही झाली नसून सिंदेवाही तालुका उमेद अभियान कार्यालयातील या दोषींना कुणाचे अभय मिळत आहे? हे न समजणारे कोडे आहे. येणाऱ्या चार दिवसात या प्रकरणाची चौकशी झाली नाही. तर महाराष्ट्र राज्याचे अभियान व्यवस्थापक यांचेकडे तक्रार दाखल करून न्याय मागण्यात येईल. असे तक्रारदार मीना बोरकर यांनी प्रसिध्दी माध्यमांना कळविले आहे.