रामाळा ग्रा.प. आवारात उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांची संख्या वाढली

रामाळा ग्रा.प. आवारात उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांची संख्या वाढली

◾ सार्वजनिक शौचालयाकडे नागरिकांची पाठ.
◾रस्त्यावर पसरली दुर्गंधी
◾ गावात रोगराही पसरण्याची दाट शक्यता.
◾ ग्राम पंचायतचे याकडे दुर्लक्ष.

सिंदेवाही :- पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या रामाळा ग्राम पंचायत कार्यालय चे आवारात सकाळी आणि सायंकाळी उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून कार्यालयासमोर नागरिकांना दोन मिनिटे उभे राहणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे ग्राम पंचायत कार्यालय येथे दोन सार्वजनिक शौचालय असूनही त्याकडे नागरिकांनी पाठ फिरवून उघड्यावर बसने पसंद केले आहे. त्यामुळें रस्त्यावर सर्वत्र दुर्गंधी पसरली असून गावात रोगराही पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राम पंचायतनी या लाजिरवाण्या प्रकाराकडे त्वरित लक्ष घालून उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
सिंदेवाही – वासेरा रोडवर असलेला रामाळा गावाची लोकसंख्या अंदाजे १४०० असून ग्राम पंचायत मार्फत अनेक योजना राबविल्या जातात. शासनाने ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी, स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी, व उघड्यावर मल विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यासाठी, निर्मलग्राम, तसेच स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत प्रत्येकाला वैयक्तिक शौचालय बांधणे, आणि शौचालयाचा वापर करणे, करिता अनुदान उपलब्ध करून दिले. त्यानुसार ग्राम पंचायत कार्यालय रामाळा अंतर्गत १०० टक्के शौचालय अनुदान प्राप्त झाले आहे. परंतु येथील ग्राम पंचायतचे दुर्लक्षित पणामुळे अनेकांनी शौचालय बांधकाम न करता केवळ बांधकाम कागदोपत्री दाखवून अनुदान हडप केले. आणि आता शौचालयासाठी बाहेर उघड्यावर जाणे सुरू केले आहे. सकाळी आणि सायंकाळी ग्राम पंचायत कार्यालयचे आवारात महिला आणि पुरुष शौचालयास उघड्यावर बसून असतात. ग्राम पंचायत कार्यालय येथे दोन सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा कोणीही त्यामध्ये न जाता कार्यालय समोरील रस्त्यावर बसतात. त्यामुळे सदर मार्गाने ये जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच अगदी गावालगत दुर्गंधी होत असल्याने हवेमुळे दुर्गंधी पसरून गावात रोगराही पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळें ग्राम पंचायत कार्यालयाने त्वरित पुढाकार घेऊन या लाजिरवाण्या प्रकाराचा बंदोबस्त करावा. अशी मागणी प्रसिद्धी माध्यमातून करण्यात येत आहे.