उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जिल्हा प्रशासनाद्वारे तपासणी

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जिल्हा प्रशासनाद्वारे तपासणी

    भंडारा,दि.26 : सांस्कृतिक खात्यातर्फे पर्यावरण पूरक गणपती उत्सवाला प्रोत्साहन म्हणून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत त्यासाठी जिल्ह्यातील नऊ सार्वजनिक गणेश मंडळाची तपासणी काल निवासी उपजिल्हाधिकारी लिना फलके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

           राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार 2023 स्पर्धा अंतर्गत भंडारा जिल्ह्यातीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पू. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचे कडे केलेले विहित नमुन्यातील अर्जबाबत मंडळाची माहिती पू. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचेकडून जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली. त्या अनुषंगाने शासनाद्वारे गठीत जिल्हास्तरीय समितीने काल दिवसभर जिल्ह्यातील नऊ सार्वजनिक मंडळाची पाहणी केली.

        तपासणी पथकामध्ये उपजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्रीमती लीना फलके, जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव शशीकुमार बोरकर, पंकज इटकेलवर, प्राध्यापक शासकीय कला महाविद्यालय, नागपूर तथा सदस्य श्री. आंबेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,  गणेश पवार, पोलीस निरीक्षक तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

          समितीने  हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळ, मोहगाव देवी ,मोहाडी, बजरंग गणेशोत्सव मंडळ, श्रीराम नगर, तुमसर,  साई  गजानन कार्यसंघ, तुमसर ,नवीन विदर्भ  सार्वजनिक  बाल गणेशोत्सव मंडळ, मालवीय नगर, तुमसर ,तुमसरचा महाराजा गणेशोत्सव मंडळ, रामकृष्ण नगर, तुमसर, साई बाल गणेश उत्सव मंडळ, सिव्हिल वार्ड, साकोली ,एकता युवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रेंगेपार कोहळी, लाखनी , आदर्श गणेशोत्सव मंडळ, पोलीस वसाहत भंडारा व सन्मित्र गणेश मंडळ, गणेशपूर, भंडारा  या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पर्यावरण पूरक मूर्ती व सजावट ध्वनिप्रदूषण, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, आरोग्य व शिक्षण विषयक कार्य, राबविण्यात येत असलेले सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्वच्छता व इतर सुविधा याबाबत आढावा घेतला.