तृतीयपंथीयांच्या समस्याबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

तृतीयपंथीयांच्या समस्याबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

         भंडारा, दि.31 : तृतीयपंथीय/ ट्रान्सजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून, या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणूक दिली जाते. नेहमीच भेदभाव, सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासनामार्फत मुलभूत अधिकारांचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिका-यांनी केले.

       तृतीयपंथीय समस्यांचे निराकरण करण्याकरीता सहायक आयुक्त ,समाजकल्याण विभाग यांनी गठीत केलेल्या समिती अंतर्गत बैठक घेण्यात आली. या बैठकीला तृतीयपंथी नायक रीना, खुशबु, ललिता व चुलबुली यांच्या समस्यांबाबत विचारणा  करून चर्चा केली.

         या समाज घटकांची सर्वांगीण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले जावे, याकरिता तसेच या समाज घटकांच्या समस्या बहुतांश विभिन्न स्वरुपाच्या असल्यामुळे शासनाचे विविध विभाग व या क्षेत्रातील कार्यरत नामांकित व्यक्तीचे मिळून त्यांच्या विकासाकरिता तृतीयपंथीय कल्याण मंडळ रुपाने स्वतंत्र कल्याणकारी उपाययोजनात्मक यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने राज्यस्तरावर तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले असल्याची माहिती सहायक आयुक्त श्री.देशमुख यांनी दिली.

              तृतीयपंथीयांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा पुरविण्याकरीता व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता शासन कटीबध्द असल्याचे सांगीतले.  तृतीयपंथीयांनी भंडारा जिल्ह्यात किन्नर समाज भवन नसल्यामुळे त्याकरीता जागा उपलब्ध करुन देवून समाजभवनाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी यावेळी केली.

          तसेच किन्नर समाज भवन बांधकामाची व जागेसंबंधीची समस्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा, असे निर्देश बाबासाहेब देशमुख सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांना देण्यात आलेत.  जिल्ह्यात 05 तृतीयपंथीयांची संख्या असून त्यापैकी 03 तृतीयपंथीयांचे शासनामार्फत ओळखपत्र, मतदार नोंदणी प्रमाणपत्र, राशनकार्ड व आधार कार्ड तयार करण्यात आलेली आहेत. उर्वरीत 02 तृतीयपंथीयांचे आधारकार्ड व मतदार नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

          तसेच तृतीयपंथीयांच्या यापुढे काही समस्या असल्यास त्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेशी संपर्क साधावा तसेच  जिल्ह्यात आणखी काही तृतीयपंथी असतील तर त्यांची नोंदणी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, विभाग, यांचेकडे करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी कळविले .