२३ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे भव्य आयोजन

२३ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे भव्य आयोजन
निघणार कलश यात्रा
सिनेकलाकार सांस्कृतीक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण
   
चंद्रपूर २१ ऑगस्ट : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद व चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत बुधवार २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यान येथे भूमातेला व मातृभूमीचे स्वातंत्र्य आणि तिचा गौरव यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांना विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाची सुरवात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असुन     शिलाफलक अनावरण, पंचप्रण शपथ, वसुधा वंदन, विरों का वंदन अंतर्गत स्वांतत्र्य सैनिकांना नमन करणे तसेच ध्वजारोहण करुन राष्ट्रगीताचे गायन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८.३० च्या सुमारास हुतात्मा स्मारक ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यानपर्यंत अमृत कलश यात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे.
सायंकाळी ६ वाजता चांदा क्लब मैदान येथे सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने साद सह्याद्रीची ,भूमी महाराष्ट्राची अंतर्गत सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,पूजा सावंत,गायक नंदेश उमप तसेच अभिनेता श्रेयस तळपदे हे या सांस्कृतीक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण राहणार असुन  नागरीकांनी यामध्ये सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व चंद्रपूर महानगरपालिका यांच्याद्वारे करण्यात येत आहे.
याप्रसंगी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, लोकसभा सदस्य अशोक नेते, आमदार रामदास आंबटकर, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया, सुभाष धोटे, किशोर जोरगेवार, प्रतिभा धानोरकर तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी,डॉ.जितेंद्र रामगावकर तसेच महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.