01 ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल सप्ताह साजरा करण्याचे नियोजन

01 ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल सप्ताह साजरा करण्याचे नियोजन

गडचिरोली, दि.31: शासन निर्णय दिनांक 25 जुलै, 2023 अन्वये, दिनांक 01 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट, 2023 रोजी पर्यंत “महसूल सप्ताह” साजरा करण्याचे योजीलेले आहे. त्याअनुषंगाने दिनांक 01 ऑगस्ट, 2023 रोजी – महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ करण्यात येऊन मागील वर्षभरामध्ये उत्कृष्ट कामे करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांचे गौरव- सन्मान करणे. दिनांक 01 ऑगस्ट, 2023 पासून म.ज.म.अ. कलम 155 खालील कोणतीही प्रकरणे ऑफलाईन माध्यमातून न स्विकारता ई- हक्क पोर्टलवर सेतू सुविधा केंद्रामार्फत नोंदवून त्यानंतर तहसिलदारांकडे पाठविण्यात यावीत. त्याचप्रमाणे नागरी भागातील मालमत्तापत्रकांसाठी देखी ई-हक्क पोर्टलवार नगमर भूमापन अधिकारी यांच्या मार्फत नोंदविण्यात यावे. तहसिलदार व नगर भूमापन अधिकारी अशा प्रकरणांवर म.ज.म.अ. कलम 155 खाली दुरुस्तीचे आदेश पारित करतील. महाराजस्व अभियानातील गांव तिथे स्मशानभूमी/ दफनभूमी सुविधा करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे योजीले आहे.
दिनांक 02 ऑगस्ट, 2023 – युवा संवाद- 10 व 12 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढिल शिक्षणासाठी राष्ट्रीयत्व, वय, वर्ष व अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न, नॉन क्रिमीलेअर, जातीचे प्रमाणपत्र इ. अर्जदारांनी दाखल केलेले व प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढुन वितरण करण्यात येईल. तसेच 12 वी नंतर विविध क्षेत्रात प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांचे “माहितीपत्रक” प्रसिध्द करणे. तसेच जिल्हयातील प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना माहिती देवून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणेबाबत अर्ज दाखल करण्याबाबत आवाहन करण्यात येते. अनाथ मुले-मुली (आई वडील मुत्यृमुखी) कोणत्याही शासकीय/ निमशासकीय/ शासन अनुदानित अनाथ आश्रमात न राहणारे यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने अनाथ असल्याचे तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधीत महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र तसेच “तर्पण फांऊडेशन” या सामाजिक संस्थेची मदतीने लाभ देण्याचे योजीले आहे.
दिनांक 03 ऑगस्ट, 2023 रोजी– एक हात मदतीचा- मान्सुन कालावधीत नागरिकांचे घराचे/ शेतीचे/ फळबागांचे/ जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतूदीनुसार मदत देण्यात येईल.
अतिवृष्टी/ पुर अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत प्रसारमाध्यमाव्दारे/ समाजमाध्यमाव्दारे संबंधती क्षेत्रिय अधिकारी/ पदाधिकारी मार्फत सर्व घटकांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करणे. नैसर्गिक आपत्ती अंतर्गंत पुनर्वसनाच्या अनुषंगाने निराकरण करण्याची कामे करणे. तालुक्यातील अतिदुर्गम गावात “महसूल अदालत” आयोजीत करण्याबाबत कार्यवाही करणे.
दिनांक 04 ऑगस्ट, 2023 – जनसंवाद- महसूल अदालतीचे आयोजन करुन जिल्हाधिकारी/ उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार स्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे/ अपिले निकाली काढणे. सलोखा योजना, गावांगावातील शेतरस्तेबाबत ची अर्ज निकाली काढणे, “आपले सरकार” या पोर्टलवर प्राप्त तक्रारीची दखल घेवून निकाली काढणे.
दिनांक 05 ऑगस्ट, 2023 सैनिक हो तुमच्यासाठी- राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी/ सैनिक यांना व त्यांच्या कुंटूंबियांना आवश्यक महसूल दाखले/ प्रमाणपत्रे प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे. तसेच त्यांना घरासाठी/ शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढणे. तसेच महसूल विभागांशी निगडीत प्रश्न निकाली काढणे.
दिनांक 06 ऑगस्ट,2023–“महसूल संवर्गातील कार्यरत/ सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी संवाद- महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत/ सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढण्याच्या दृष्टीने कार्यालय प्रमुख व्यक्तीश: संबंधीताच्या अडचणी समजून घेऊन त्या निकाली काढण्याच्या अनुषंगाने सुचना/ मागदर्शन करणे.

दिनांक 07 ऑगस्ट, 2023 “महसूल सप्ताह सांगता समारंभ- उपरोक्त कालावधीत विविध उपक्रमांबाबतची फलनिष्पती व विशेष उल्लेखनिय कामकाजाची दखल घेण्यासाठी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजीत करावा. सदर कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी/ पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, स्वंयसेवी/ सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सर्व घटकातील मान्यवर व्यक्ती इ. तसेच अन्य विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांना देखील निमंत्रित करण्यात येईल. असे तहसिलदार (सामान्य), सुनिल सौंदाने यांनी कळविले आहे.