राजुरा सोमनाथपुरा वार्डातील गोळीबार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक

राजुरा सोमनाथपुरा वार्डातील गोळीबार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक गुन्हयात वापरलेला देशी पिस्टल जप्त

यातील फिर्यादी नामे मृणाल राजेंद्र डोहे वय २८ वर्ष रा. सोमनाथपुरा वार्ड राजुरा यांनी पोलीस स्टेशन राजुरा येथे रिपोर्ट दिला की, दिनांक २३/७/२०२३ चे २०:३० वाजता सुमारास यातील जखमी नामे लल्ली उर्फ बलदेवसिंग शेरगील वय २७ वर्ष रा. सोमनाथपुरा वार्ड राजुरा याला मारण्यासाठी आलेल्या गुन्हेगारांनी त्याचेवर गावठी पिस्टलने गोळीबार केला असता सदर गोळीबारात फिर्यादीची वहीणी सौ. पुर्वशा सचिन डोहे वय २५ वर्ष हिला छातीत गोळी लागुन तिचा मृत्यु झाला आणि जखमी लल्ली उर्फ बलदेवसिंग शेरगील याचे पाठीत गोळी लागुन तो जखमी झाला. यावरुन पोलीस स्टेशन राजुरा येथे अपराध क्रमांक ४०४/२०२३ कलम ३०२, ३०७, ३४ भादंवि सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचे प्राथमिक तपासात असे दिसुन येते की, सन २०२२ मध्ये आरोपी नामे लबज्योतसिंग हरदेवसिंग देवल वय २० वर्ष रा. सोमनाथपुरा वार्ड राजुरा याचे विरुध्द पोलीस स्टेशन राजुरा येथे भारतीय हत्यार कायदा नुसार गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयाची खबर ही जखमी लल्ली उर्फ बलदेवसिंग शेरगील यांनी दिला असा आरोपीचा रोष होता, तसेच आरोपीच्या भावास दोन वर्षापूर्वी लल्ली उर्फ बलदेवसिंग शेरगील याने मारहाण केली होती या जुन्या वैमनस्यावरुन आरोपी लबज्योतसिंग देवल आणि त्याचा साथीदार विधीसंघर्ष (१७ वर्षीय अल्पवयीन) बालक याने संगनमत करुन लल्ली उर्फ बलदेवसिंग शेरगील याचा पाठलाग करुन तो त्याचा मित्र सचिन डोहे यांचे घरी काही कामानिमित्त आलेला असतांना आरोपीतांनी त्याचेवर गोळीबार केला त्याच दरम्यान यातील मृतक सौ. पूर्वशा सचिन डोहे ही घरा बाहेर आली असता तिचे छातीत गोळी लागुन तिचा मृत्यु झाला. आरोपीताने एकुन ४ राऊंड फायर केले असता त्यापैकी एक गोळी जखमीस आणि एक मृतक हिला लागुन दोन राऊंड मिस झाल्याचे दिसुन येत आहे.

सदर गुन्हयातील आरोपी घेवुन लबज्योतसिंग देवल आणि त्याचा साथीदार विधीसंघर्ष (१७ वर्षीय अल्पवयीन ) बालक हे घटना करुन फरार झाले असतांना पोलीसांनी त्यांचा शोध घेवुन दोघांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे कडुन गुन्हयात वापरलेले हत्यार गावठी बनावटी पिस्टल व ३ काडतुस जप्त करण्यात आले आहे.

सदर गुन्हयाचे घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा श्री दिपक साखरे यांनी भेट दिली असुन त्यांच्या मार्गदर्शनात परि. पोलीस उपअधिक्षक श्री विशाल नागरगोजे यांनी सदर गुन्हा नोंदविला असुन गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक यांनी गुन्हयाचा पुढील सखोल तपास श्री महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना सोपविला असुन अधिक तपास सुरु आहे.