प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकरी सहभाग नोंदविणेबाबत

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकरी सहभाग नोंदविणेबाबत

गडचिरोली,दि.19: प्रधानमंत्री पीक विमा योजना हि शेतक-यांना नैसर्गिक आपत्ती, किड रोगासारख्या टाळता न येवू शकणा-या अकल्पीत प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देवून नुकसान भरपाई देणारी योजना आहे. 23 जून 2023 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम राज्य शासनाकडून भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ एक रुपयात विमा भरता येणार आहे. शिवाय विमा भरणा-या सामुहिक सेवा केंद्रानाही कंपनी प्रति लाभार्थी 40 रु. देणार आहे. पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम दिनांक 31 जुलै आहे.

1) पिक विमा कोण घेवू शकतो- अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांची लागवड करणारे सर्व कर्जदारआणि बिगर कर्जदार (भागीदार/कुळधारक) शेतकरी पिक विम्याचा लाभ घेवू शकतात.

2) प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खालील जोखमींचा समावेश आहे- अ) हंगामातील प्रतिकुल परिस्थिती ब) काढणी पश्चात नुकसान भरपाई क) स्थानिक आपत्ती ड) हंगामाच्या अखेरीस सरासरी उत्पन्नाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित करणे.

3) पिक विमा काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-अ) बिगर कर्जदार शेतक-याने जमीन मालकी दस्तऐवज 7/12, ब) 8 अ), बँक पासबुक, क) आधार कार्ड, इ) पिक पेरणी प्रमाणपत्र (राज्य अधिसुचनेत अनिवार्य असल्यास)4) अधिक माहितीसाठी संपर्क :- किसान कॉल सेंटर 1800-180-1551, सी.एस.सी.(ई-सेवा केंद्र), बँक किंवा विमा एजंट तसेच संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क साधावा. करीता आपले कार्यक्षेत्रातील/गावातील संपूर्ण शेतकरी बंधु/भगिनींना प्रधानमंत्री पीक विमायोजनेमध्ये सहभाग नोंदविणेबाबत जास्तीत जास्त प्रचार, प्रसिद्धी करुन आपण सर्व शेतक-यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देऊ या. असे उपविभागीय कृषि अधिकारी, गडचिरोली  यांनी कळविले आहे.