21 सप्टेंबर रोजी जिल्हा मुख्यालयी विविध योजनांसाठी कर्ज मेळाव्याचे आयोजन

21 सप्टेंबर रोजी जिल्हा मुख्यालयी विविध योजनांसाठी कर्ज मेळाव्याचे आयोजन

कर्ज प्रस्ताव प्रलंबित ठेवू नका – जिल्हाधिकारी, मीणा

बँकर्सच्या आढावा बैठकीत कर्ज वितरणावर झाली चर्चा

गडचिरोली, दि.06: गडचिरोली जिल्हयातील शेतकरी हा धान शेती व कृषी संलग्न घटकांवरती अवलंबून असतो, त्यासाठी मागणी केलेली कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवू नका अशा सूचना जिल्हाधिकारी, संजय मीणा यांनी जिल्हास्तरीय बँकर्स बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. पिक कर्ज, कृषी कर्ज, किसान क्रेडीट कार्ड वितरण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कर्ज, मत्स्य व्यवसाय कर्ज या आणि अशा सर्व योजनांबाबतच्या कर्ज वाटपावर या बैठकीत उपस्थितांना सूचना जिल्हाधिकारी मीणा यांनी दिल्या. याबाबत आलेले प्रस्तावांची शहनिशा करून पात्र खातेदारांना वेळेत कर्ज पुरवठा करावा अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. गरजूंना वेळेत कर्ज पुरवठा होण्यासाठी जिल्हास्तरावरती दि.21 सप्टेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात भव्य स्वरूपात शासकीय योजनांमधील कर्ज वाटप मेळावा आयोजित केला जाणार आहे. या ठिकाणी जिल्हयातील सर्व बँक कार्यालये त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्या ठिकाणी योजनेच्या कर्ज मागणीसह सविस्तर प्रस्ताव, कागदपत्र सादर करावीत. या ठिकाणी यापुर्वीचे सर्व प्रलंबित व नवीन आलेल्या अर्जांवर निर्णय घेतला जाणार आहे.

जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्यांना एका महिन्यात किसान क्रेडीट कार्ड वाटप होणार

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी किसान के्रडीट कार्ड वाटपाबाबत विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना बँक प्रमुखांना बैठकीत दिल्या. जिल्हयात सर्वात जास्त खातेदार जिल्हा बँकेकडे आहेत. परंतू इतर राष्ट्रीयकृत बँकानाही आपल्या खातेदारांना किसान क्रेडीट कार्ड वाटप करणे गरजेचे आहे. येत्या महिना अखेर पर्यंत खातेदार निश्चित करून त्यांना किसान क्रेडीट कार्ड वाडप केले जाणार आहे.