टोमॅटो पिकाची लागवड आणि उपलब्धता बाबत

टोमॅटो पिकाची लागवड आणि उपलब्धता बाबत

 

राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५६-५७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४० ते ४२ हजार हेक्टर तर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्र असते. यापासून सर्वसाधारणपणे १० लाख मे. टन उत्पादन अपेक्षित असते.

 

जुलै २०२३ मध्ये बाजारात टोमॅटो चे वाढलेले दर लक्षात घेता यावर सविस्तर माहिती आणि उपयोजना साठी मा. आयुक्त कृषी, श्री. सुनील चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १ जुलै आणि दिनांक ११ जुलै रोजी कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, संशोधन संचालक, जिल्ह्यांचे अधीक्षक कृषी यांच्या समवेत सदर प्रश्नांचे अनुषंगाने बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत टोमॅटो पिकाखालील खरीप २०२३ हंगामातील क्षेत्र आणि उत्पादन याबाबत माहिती तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात गेल्या डिसेंबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान टोमॅटो ला बाजारात अतिशय अल्प दर मिळाल्याने (डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान ६ ते ९ रुपये प्रति किलो, मार्च २०२३ दरम्यान ११ रुपये प्रति किलो व एप्रिल २०२३ ते मे २०२३ दरम्यान ८ ते ९ रुपये प्रति किलो) शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. त्यामुळे नवीन टोमॅटो लागवडीवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

 

या व्यतिरिक्त मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवेळी पाऊस, गारपीट यामुळे देखील टोमॅटो आणि इतर भाजीपाला याचे नुकसान झाल्याने त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असल्याचे दिसून येते. चालू वर्षी पाऊस देखील जून महिन्यात जवळपास १५ दिवस उशिरा आला आणि तो सरासरीच्या जेमतेम ५४% झाला. यामुळे नवीन लागवडीस उशीर झाला असल्याचे आढळून येते. टोमॅटो पिकावरील कीड व रोग याबाबत देखील या बैठकीत चर्चा करून नवीन जाती, कीड आणि रोग प्रतिबंधात्मक उपाय योजना यावर चर्चा करण्यात आली.

 

सद्या शेतकरी नविन टोमॅटोची लागवड करत आहेत. याबाबत येत्या ७-८ दिवसात वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होईल. टोमॅटो लागवडीबाबत नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रमुख क्षेत्र असून त्या जिल्ह्यांच्या अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कडून प्रामुख्याने नवीन लागवडी बाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. तो प्राप्त होताच टोमॅटो लागवड, उत्पन्न व भाव याबाबत अधिक वस्तुस्थिती स्पष्ट होईल.