मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोलीत येणार

शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोलीत येणार

“शासन आपल्या दारी” उपक्रमातून 6.97 लक्ष नागरिकांना विविध योजना व सेवांचा लाभ वितरीत

 

गडचिरोली, दि.06 : गडचिरोली जिल्हयात आत्तापर्यंत झालेल्या “शासन आपल्या दारी” उपक्रमातून 6.97 लक्ष नागरिकांना विविध योजना तसेच दाखले दिले आहेत. या उपक्रमातील जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पावार गडचिरोलीत येणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली लगत असलेल्या कोटगल एमआयडीसी येथील क्रीडांगणावर करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हयातील शासन आपल्या दारी या उपक्रमाचे कौतुक सर्वच राज्यभर केले जात आहे. राज्यात सर्वात जास्त लाभ गडचिरोली जिल्हयाने वितरीत केले आहेत.

 

शासन आपल्या दारी उपक्रमातून अनेक गरूजूंना योजनांबरोबरच विविध दाखले देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना आता शासनाच्या इतरही योजना घेणे सोयीस्कर होणार आहे. कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. हेच लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जात आहे. गडचिरोली जिल्हयातील जिल्हास्तरावरील कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दि.08 जुलै रोजी गडचिरोली येथे सकाळी 11.00 वा येणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने जिल्हयातील विविध गावातील लाभार्थी सहभागी होणार आहेत. याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते हजारो लाभार्थ्यांना योजनांचे लाभही वितरीत करण्यात येणार आहेत.

सर्वसामान्यांना शासकीय दाखले जसे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, वय व अधिवासाचे दाखले, नॉन क्रीमीलेअर, शेतकरी दाखला, कामगार कार्ड, आयुष्यमान कार्ड, रेशन कार्ड दुरूस्ती, ग्रामपंचायतीमधील विविध दाखले, नागरिकांचे विविध अभिलेख, मतदार नोंदणी अथवा नाव दुरूस्ती अशा अनेक प्रकारच्या दाखल्यांची किंवा कागदपत्रांची गरज असते. यातील वेगवेगळया 33 योजनांमधील योजना सेवांचा लाभ गडचिरोली जिल्हयात दिला आहे. राज्यात सर्वांत चांगली कामगिरी या उपक्रमात गडचिरोली जिल्हयाने केली आहे.

 

संजय मीणा, जिल्हाधिकारी गडचिरोली – गडचिरोली येथे शनिवारी दि.8 जुलै रोजी मुख्यमंत्री महोदय येणार असून जिल्हयातील सर्वांत मोठा शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन कोटगल परिसरात एमआयडीसी येथे करण्यात आले आहे. त्याठिकाणी कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत.