व्यायामशाळा/क्रीडांगण विकास व युवक कल्याण अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव आमंत्रित

व्यायामशाळा/क्रीडांगण विकास व युवक कल्याण अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव आमंत्रित

 

भंडारा दि.23: महाराष्ट्र शासनाच्या नविन क्रीडा धोरणाअंतर्गत सन 2023-24 या सत्राकरीता व्यायामशाळा विकास, क्रीडांगण विकास व युवक कल्याण विषयक अनुदान योजनेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी, व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत ओपन जिम व व्यायाम साहित्य खरेदी करणे तसेच नविन व्यायामशाळा बांधकाम करणे यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. तसेच क्रीडांगण विकास अनुदान योजनेतून क्रीडांगण समपातळीत करणे, 200/400 मी. धावनमार्ग तयार करणे, विविध खेळाची प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह बांधणे, भांडारगृह बांधणे, पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणाभोवती भिंतीचे अथवा तारेचे कुंपण तयार करणे इ. बाबीकरीता अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

जि.प.शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, याशिवाय आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा तसेच ग्रामपंचायत, शासकीय यंत्रणा इत्यादींना सदर योजनेंतर्गत मुलभुत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान देय आहे.

ही योजना राबविण्यासाठी विहीत नमुन्यातील परीपुर्ण प्रस्ताव दि. 15 जूलै, 2023 पर्यंत स्विकारण्यात येतील. योजनेसंदर्भात अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्जासाठी इच्छुक संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी द्वारा छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, भंडारा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी कळविले आहे.