चंद्रशेखर आजादांच्या स्वप्नातील सुराज्य साकारण्याची जबाबदारी आपली : सुधीर मुनगंटीवार

चंद्रशेखर आजादांच्या स्वप्नातील सुराज्य साकारण्याची जबाबदारी आपली : सुधीर मुनगंटीवार

| हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला भेट

चंद्रशेखर आजाद नगर, (जि.अलिराजपूर, मध्य प्रदेश) , दि. 20 जून 2023:

 

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध तरुणांना एकत्र करुन क्रांतीकारक लढा देणाऱ्या आणि हौतात्म्य पत्करणाऱ्या चंद्रशेखर आजाद यांच्या स्वप्नातील सुराज्य साकारण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. आजाद यांच्या स्मारकातून मी प्रचंड ऊर्जा घेऊन परत जात आहे, असेही ते म्हणाले. चंद्रशेखर आजाद नगर (भापरा) या अमर हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या मध्य प्रदेशातील जन्मस्थळाला सोमवारी भेट दिली तेव्हा ते बोलत होते. ना.श्री सुधीर मुनगंटीवार सध्या मोदी@9 महासंपर्क अभियानासाठी मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत.

 

या दौऱ्यात त्यांनी अलिरजपूर जिल्ह्यातील आदीवासी बहुल भागातील भापरा (चंद्रशेखर आजाद नगर) येथील हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला स्थानिक जिल्हा भाजपा पदाधिकाऱ्यांसह सोमवारी भेट दिली. चंद्रशेखर आजाद यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर त्यांनी या स्मारकात असलेल्या चंद्रशेखर आजाद यांच्या जीवनावरील चित्र व छायाचित्र प्रदर्शनला भेट दिली. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत बोलतांना त्यांनी भारावून गेल्याची भावना व्यक्त केली.

 

यावेळी बोलतांना ना.श्री मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रशेखर आजाद हे अनेक क्रांतिकारकांची प्रेरणा होते. अत्यंत गरीबीत जन्मलेल्या चंद्रशेखर आजाद यांनी शाळेत असल्यापासूनच स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. भगतसिंह यांची प्रेरणा चंद्रशेखर आजाद होते. त्यांच्या या जन्मस्थळाला भेट दिल्यावर प्रचंड ऊर्जेचा शक्तिसंचार झाल्याचा अनुभव मी घेत आहे. आजाद यांच्यासारख्या शेकडो हुतात्म्यांच्या सर्वोच्च त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्य आणि लोकशाही अनुभवत आहोत. देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या या अमर हुतात्म्यांचे आपल्यावर मोठे ऋण आहे. आता त्यांच्या स्वप्नातील भारतीय सुराज्य निर्माण करण्याचे उत्तरदायीत्व आपल्यावर आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

 

हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जनामस्थळ स्मारकाच्या या भेटीच्या वेळी मध्य प्रदेश वनविकास महामंडळाचे अध्यक्ष श्री माधोसिंग डावर यांच्यासह अलिराजपूर जिल्ह्याचे भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.