सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी 30 जूनपूर्वी पूर्ण करा- मुख्य कार्यकारी अधिकारी

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी 30 जूनपूर्वी पूर्ण करा- मुख्य कार्यकारी अधिकारी

· सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी अभियान

 

भंडारा, दि. 16 : जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी अभियान भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर राबविण्यात येत आहे. 30 जून पूर्वी पिण्याच्या पाण्याच्या 8759 स्त्रोतांची रासायानिक तपासणी पूर्ण करावयाची आहे. गट विकास अधिकारी यांनी, संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना निर्देश देऊन तपासणी दिलेल्या वेळेत पूर्ण करावी असे निर्देश भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. विवेक बोंद्रे यांनी दिले आहे.

 

पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्याचे निर्देश राज्यस्तरावरून प्राप्त झाले असून वेळेत तपासणी व्हावी याकरिता राज्यस्तरावरून निर्देश देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. एम. एस. चव्हाण यांनी, जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्याचे नियेाजन करून गट विकास अधिकारी पाठविण्यात आले आहे. या जिल्ह्यातील 8759 पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी मान्सूनपूर्व तपासणी अभियानात करण्यात येत आहे. तपासणी करावयाच्या स्त्रोतांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना, बोअरवेल, विहीरी, तसेच शाळा व अंगणवाडी केंद्रातील स्त्रोतांच तपासणी करण्यात येत आहे. सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधुन जल सुरक्षकांमार्फतवॉटर क्वालिटी एमआयएस (WQMIS) ॲपनुसार पाणी नमुने गोळा करून कार्यकक्षेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा करावयाचे आहे. पाणी नमुने घेताना मुख्यत्वे पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या स्रोतातून व योजना नसल्यास वापरात असलेल्या स्त्रोतातून घ्यावेत. प्रत्येक गावांमधून २ घरांमधील, शाळा आणि अंगणवाड्यांमधील नळाच्या पाण्याचे नमुने घ्यावयाचे आहेत. पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठवताना, कॅनवर पाणी नमुन्याचा (WQMIS) पोर्टल वरील नोंदीचा संकेतांक असणे गरजेचे आहे. जलसुरक्षाकांमार्फत पाणी नमुने गोळा करणे व ते नमुने (WOMIS) पोर्टल वरील योग्य त्या माहितीसह प्रयोगशाळेत तपासणीस पाठविणेकरीता समन्वय उपविभागीय समन्वयक (पाणी गुणवत्ता) यांची मदत घ्यावयाची आहे. तसेच जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार, जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक यांनी आवश्यक त्या माहितीसह सर्व पाणी नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातील याकरीता संनियंत्रण करावयाचे आहे.

 

प्रयोगशाळेत रासायनिक तपासणीसाठी प्राप्त होणा-या सर्व नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेमधील रसायनी यांच्यामार्फत करून तपासणीच्या परिणामांची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर 30 जून पर्यंतच करण्यात यावी. याकरीता वरिष्ठ भूवैज्ञानिक यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे.

 

दूषीत स्त्रोतावर काय ? करावी कार्यवाही

 

प्रयोगशाळा तपासणीत रासायनिक घटकांसाठी दूषित आढळलेल्या पाणी स्त्रोतांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावयाची आहे. उपाययोजनांच्या नोंदी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करावयाच्या आहेत. अभियानादरम्यान जिल्ह्यातील दूषित आढळलेल्या सर्व पाणी स्त्रोतांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नोंदी प्राधान्याने करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेमार्फत गोळा करण्यात आलेले पाणी नमुने आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून तपासणी केल्या जात असलेल्या पाणी नमुन्यांची प्रगती राज्यस्तरावरून पडताळली जात आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर सुरू असून 30 जून पूर्वी पाणी नमुने प्रयोगशाळांना पोहचते करून तपासणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांनी दिले आहे.