बाळाचा जन्म होताच आधार नोंदणी करा – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

बाळाचा जन्म होताच आधार नोंदणी करा – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

· दहा वर्षापूर्वीचे आधारकार्ड अद्ययावत करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन          

 

भंडारा, दि. 2 : आधार कार्ड हा फक्त ओळखीचा पुरावा नाही तर अनेक सरकारी आणि इतर लाभ घेण्यासाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. या आधार कार्डमध्ये आवश्यक माहिती असल्याने महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. त्याअनुषंगाने बाल आधार नोंदणीच्या कामकाजाला गती देण्यात यावी. रुग्णालयात बालकांचा जन्म होताच आधार नोंदणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

 

जिल्हास्तरीय आधार नोंदणीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोनकुवर, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) मनीषा कुरसंगे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

शासनाने आधार अद्यावतीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आधार कार्डवरील पत्ता, मोबाईल क्रमांक अपडेट असणे आवश्यक आहे. परंतु आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 9 हजार 98 आधार अद्यावतीकरण झाले असून 7 लाख 611 आधार अद्यावतीकरण प्रलंबित आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डचे अद्यापही अद्यावतीकरण केले नसलेल्या नागरिकांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

 

दहा वर्षापूर्वी ज्यांनी आधार कार्ड काढले, त्या वेळचा पत्ता ही तोच आहे, मोबाईल क्रमांक ही बदलला नाही, अशा नागरिकांनाही आता ऑनलाईन व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. आधारच्या संकेतस्थळावरून https://uidai.gov.in/ किंवा myaadhaar वर जाऊन आधार ऑनलाईन अपडेट केल्यास 14 जून 2023 पर्यंत कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तसेच आपले सरकार सेवा केंद्रावर 50 रुपये शुल्क आकारले जाईल.