आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यित नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत मिशन दौरा भंडाऱ्यात दाखल

आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यित नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत मिशन दौरा भंडाऱ्यात दाखल

 

· माविमच्या कामाची पाहणी; दुध संकलन केंद्राला भेट

 

भंडारा, दि. 25 : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यित नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत मिशन टीम आज दि. 25 एप्रिल रोजी भंडाऱ्यात दाखल झाली.

 

या मिशन टीममध्ये प्रमुख एलिझाबेथ सेंडीवाला, श्रीराम सिंह, विनय तुली, विरेंद्र गर्ग, महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबईचे प्रशासकीय व्यवस्थापक महेंद्र गमरे, उपव्यवस्थापक महेश कोकरे, विभागीय संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी राजू इंगळे यांचा समावेश आहे.

 

व्हि. के. हॉटेल, भंडारा येथे मिशन टीमने माविम, भंडारा कामाचा आढावा घेतला. यावेळी माविम,भंडाराचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी सादरीकरण केले. यात विविध योजनांची माहिती देण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा यांच्याद्वारा बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या एकलारी येथील किरण गारमेंट्स मॅन्युफॅक्चरींग अॅंड ट्रेनिंग सेंटर येथील कामाची पाहणी केली. कामधेनू दुध संकलन केंद्र, डोंगरगाव येथे दुध संकलन केंद्राची पाहणी करून दुधसखी व दिनशा डेअरी प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आंधळगाव येथील तेजस्विनी रेशीम वस्त्र उद्योगाची पाहणी केली.