सुंदर माझा दवाखाना उपक्रमातुन होणार स्वच्छतेचा जागर / जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेने शुभारंभ

सुंदर माझा दवाखाना उपक्रमातुन होणार स्वच्छतेचा जागर / जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेने शुभारंभ

 

भंडारा, दि. 10 : जिल्ह्यातील 7 ग्रामीण रुग्णालय व 2 उपजिल्हा रूग्णालयात सुंदर माझा दवाखाना हा उपक्रम राबविण्यात येणार असून जागतीक आरोग्य दिनी शनिवार 7 एप्रिल रोजी या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा सामान्य रूग्णालयातून झाला.

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांच्यासह डॉक्टर व नर्सेस यांनी स्वत: श्रमदान करून परिसराची स्वच्छता केली. यावेळी राज्य शासनाने सुंदर माझा दवाखाना या राबवलेल्या उपक्रमाची श्री. सोयाम यांनी कर्मचाऱ्यांना माहिती दिली. जागतिक आरोग्य दिनाच्या निमीत्ताने आरोग्य मंत्र्यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवा अधिक सुंदर व स्वच्छ करण्यासाठी हा उपक्रम राज्य भर राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यंदा आरोग्य दिनाची संकल्पना सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा व सर्वांसाठी आरोग्य ही आहे. या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य जगभरात समान आरोग्य सेवा सुविधांबद्दल जागृकता पसरवणे आणि आरोग्याशी संबंधीत सर्व गैरसमज दुर करणे हे आहे. सध्या आरोग्य संस्थामध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता दिवस पाळला जातो. हा स्वच्छता दिवस नियमित राबवायचा असून स्वच्छता दिनाचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी सुंदर माझा दवाखाना हा उपक्रम राबविण्याविषयी सुचना केल्या आहेत.

 

राज्याच्या सर्व आरोग्य संस्थांमध्ये 7 ते 14 एप्रिल या कालावधीत सुंदर माझा दवाखाना उपक्रमात आरोग्य संस्था, सर्व विभाग, भोवतालचा परिसर, स्वच्छतागृहे, भांडारगृहे यांची स्वच्छता करण्यात यावी तसेच आरोग्य संस्थांच्या आवारात व दर्शनी भागात सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि आरोग्य संस्थेमार्फत जनतेला देण्यात येणाऱ्या सेवांचे फलक लावण्याचे निर्देशीत केले आहे.