यशकथा -8 सात लिटर दुधावरून १२५ लिटर दुधाचे संकलन

यशकथा -8 सात लिटर दुधावरून १२५ लिटर दुधाचे संकलन

रंजना न्यायखोर ठरल्या प्रेरणादायी

 

बचत गटाच्या माध्यमातून डोंगरगाव येथील रंजना नायखोर यांनी दूध संकलन केंद्र सुरू केले. दूध संकलन केंद्रावर सुरुवातीला फक्त सात लिटर दूध प्राप्त होत होते. बघता बघता आज रोजी 125 लिटर दुधाचे संकलन करणाऱ्या रंजना न्यायखोर आता इतर दूध संकलन केंद्र चालवणाऱ्या महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

 

मोहाडी तालुक्यातील निर्झरा महिला बचत गटाच्या रंजना न्यायखोर यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा यांच्या तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत नोव्हेंबर २०२२ मध्ये गावातच दूध संकलन केंद्राला सुरुवात करण्यात आली. एक महिना जवळपास फक्त सात ते आठ लिटर दूध प्राप्त व्हायचे. हळूहळू बचत गटाच्या माध्यमातून बचत गटातील महिला पशुपालकांच्या सभा घेणे, दूध संकलन केंद्राचा प्रचार व प्रसार करणे, यासारख्या बाबी केल्यामुळे दोन ते तीन महिन्यातच त्यांच्या दूध संकलन केंद्रावर १२५ लिटर दूध प्राप्त होत आहे. रंजना न्यायखोर ह्या ४५ वर्षाच्या असून बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आहेत. त्या शेतकरी कुटुंबातील असतांनासुद्धा मुलाला इंजीनियरिंग पर्यंतचे शिक्षण दिले आहे. कोणत्याही कामाला त्या कधीही कमी लेखत नाही. दूध संकलन केंद्र चालविणाऱ्या दूध सखींना एक लिटर दुधामध्ये एक रुपया मिळत असल्याने रंजना न्यायखोर यांना प्रती दिवस १२५ रुपये मिळायला सुरुवात झाली. सकाळी दोन ते तीन तासांमध्ये त्यांना १२५ रुपये उत्पन्न प्राप्त होत असल्याने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला. मुलगा इंजिनीयर असताना त्याला कुठली नोकरी नाही. तोही आईला मदत करतो. त्यामुळे दुधातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आर्थिक अडचण असतांनाच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राने ही संधी दिली. यातूनच महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येते. रंजना न्यायखोर ह्या इतर दूध संकलन केंद्र चालविणाऱ्या दूध संकलन सखींसाठी प्रेरणादायी ठरत आहेत, हे मात्र खरे!

शैलजा वाघ दांदळे,  जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा