१०० टक्के शास्तीचा लाभ घेण्यास मुदतवाढ, १५ मार्च पर्यंत घेता येणार लाभ

१०० टक्के शास्तीचा लाभ घेण्यास मुदतवाढ, १५ मार्च पर्यंत घेता येणार लाभ

१६ ते २६ मार्च पर्यंत मिळणार ५० टक्के शास्तीमाफी  

अनेक मालमत्ताधारकांनी घेतला शास्तीचा लाभ

 

चंद्रपूर १ मार्च – चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात येत आहे. ६ फेब्रुवारीपासून ही योजना सुरु असून १५ मार्च रोजी १०० टक्के शास्ती माफीची शेवटची मुदत आहे. तसेच १६ ते २६ मार्च दरम्यान ५० टक्के सूट मिळणार असुन शास्ती माफीचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी केले आहे.

महापालिका क्षेत्रात ८० हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करणे ही कर विभागाची पहिली प्रक्रिया मानली जाते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शहरातील नागरिकांना शास्तीत १०० टक्के माफी देण्यात आली. या योजनेचा लाभ शहरातील मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात घेतल्यानंतर चंद्रपूर शहर महानगरपालिकेने या योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. नुकतेच २१,३२,७०१/- रुपयांची थकबाकी असणाऱ्या काजी व्यापार संकुल येथील ७ गाळ्यांना मनपा कर वसुली पथकाने सील ठोकले होते. मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी असल्याने वसुलीसाठी प्रत्येक झोननिहाय जप्ती पथक गठीत करण्यात आले असुन सदर जप्ती पथके पुर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येऊ शकतो. १०० टक्के सूट मिळविण्यासाठी बुधवार १५ मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत कराचा भरणा करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.