पशुधनांची काळजी घ्या…..लंपीची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करा

पशुधनांची काळजी घ्या…..लंपीची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करा

भंडारा दि. 07 : पशुधनातील लंपी त्वचारोग हा विषाणूजन्य रोग आहे. गाई व म्हशींमध्ये हा रोग प्रामुख्याने आढळून येतो. सर्व वयोगटातील जनावरे आणि नर व मादी दोघांनाही हा रोग होऊ शकतो. परंतु, तरूण जनावरे या आजारास अतिसंवेदनशील असल्यामुळे त्यांना तीव्र स्वरूपाचा आजार होण्याची शक्यता जास्त असते. लंपी या रोगाचे संक्रमण जनावरांपासून माणसांना होत नाही.

बहुसंख्य आफ्रिकन देशांमध्ये लंपी स्किन डिसीज हा पूर्वीपासून अस्तित्वात आहे. सन 2012 पासून हा रोग मध्यपूर्व व दक्षिणपूर्व युरोप, बाल्कन, कॉकेशस, रशिया आणि कझाकस्तान या देशांमध्ये वेगाने पसरला आहे. भारतामध्ये ऑगस्ट 2019 मध्ये सदर रोग पहिल्यांदा ओरिसा राज्यामध्ये आढळून आला व त्यानंतर इतर राज्यांमध्ये त्याचा प्रसार होण्यास सुरूवात झाली.

या रोगाचा संसर्ग “कॅप्रीपॉक्स” विषाणू मुळे होतो. याला नीथलिंग व्हायरस देखील म्हणतात, हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणू संबंधित आहे. लंपीचा विषाणू हा अत्यंत स्थिर विषाणू असून, त्वचेवरील वाळलेल्या खपल्यांमध्ये दीर्घ काळासाठी (अंदाजे 30-35 दिवस) जिवंत राहू शकतो तसेच, बाधित जनावरांच्या गोठ्यांमध्ये जर पुरेश्या प्रमाणात सुर्यप्रकाश येत नसेल, तर तेथे हा विषाणू काही महिने देखील जिवंत राहू शकतो. परंतु व्यवस्थित सुर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी हा विषाणू परिणामकारकरित्या नष्ट होतो. तसेच लिपिड सॉल्व्हेंट्स असलेले डिटर्जट्स उदा. सोडियम डोडेसिल सल्फेट व इतर रसायने उदा. इथर (20%), क्लोरोफॉर्म, फॉमॅलिन (1%), फिनॉल (2%/15 मिनिटे), सोडियम हायपोक्लोराइट (2-3%) ईत्यादी च्या वापराने हा विषाणू त्वरित नष्ट होतो. त्वचेवरील गाठी व खपल्यांमध्ये हा विषाणू जास्त प्रमाणात आढळून येतो. तसेच, बाधित जनावराच्या रक्त, लाळ, शरीरातून बाहेर टाकले जाणारे सर्व प्रकारचे स्वाव व विर्यामध्ये देखील एल एसडी विषाणू असून शकतो.

हा रोग प्रामुख्याने आथ्रॉपॉड वेक्टरद्वारे (उदा. डास, माशी, गोचिड ) इत्यादीमुळे पसरतो. आजपर्यंत कोणत्याही विशिष्ट वेक्टरची आळख पटली गेली नसली तरी डास, चावणाऱ्या माश्या आणि गोचिड हे रोगप्रसारास मुख्यत: कारणीभूत आहेत. बाधित वळूंच्या वीर्यातून हा विषाणू बाहेर टाकला जाऊ शकतो. तथापि बाधित जनावरांच्या वीर्यातून या रोगाचा प्रसार व संक्रमण झाल्याचे अद्यापही दिसून आलेले नाही. बाधित जनावरांच्या खांद्यातून व पाण्यातून तसेच लाळेमधून रोगाचा प्रसार व संक्रमण होतो अथवा नाही याबाबत अद्यापही ठोस स्वरूपाची माहिती उपलब्ध नाही. रोगाची बाधा झाल्यावर या विषाणूचा संक्रमण कालावधी सर्वसाधारणपणे 4 ते 14 दिवसांपर्यत असतो. परंतु काहीवेळेस हा कालावधी 24 दिवसांपर्यंत असू शकतो. या रोगामध्ये मध्यम स्वरूपाचा ताप 2 ते 3 दिवस राहतो. परंतु काहीवेळेस 41 डिग्री सेल्सियस एवढा ताप येऊ शकतो. ताप येऊन गेल्यानंतर संपूर्ण शरीरावर त्वचेच्या खाली 2 ते 5सेमि परिघाच्या गोल आकाराच्या घट्ट गाठी येतात. विशेषत: डोके, मान, पाय, कास व जननेंद्रियात गाठी येतात. तसेच तोंडात, घशात व श्वास नलिकेत देखील पुरळ-फोड येतात. तोंडातील पुरळांमुळे जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळत राहते. अशक्तपणा, भूक कमी होणे व वजन कमी होणे ही लक्षणे दिसून येतात. नाक, डोळे व लिंफ ग्रंथी सूजतात तसेच, पयावर देखील सूज येते. कधीकधी एक किंवा दोन्ही डोक्यांमध्ये वेदनादायक अल्सरेटिव्ह जखमा उद्भवतात. मोठ्या गाठी नेक्रोटिक होऊ शकतात आणि अखेरीस फायब्रोटिक होऊ शकतात आणि कित्येक महिने शरीरावर टिकून राहतात. गाठीमुळे पडलेले चट्टे शरीरावर बऱ्याच कालावधीकरीता अथवा कायमच राहू शकतात. गाठींमध्ये माश्यांनी घातलेल्या अंड्यांमुळे शरीरावरील जखमांमध्ये अळ्या व्हायचे प्रमाण वाढते. तोंड, अन्ननलिका, श्वासनलिका व फुफ्फुसांमध्ये पुरळ व अल्सर निर्माण होऊ शकतात. जनावराचे पाय, गळा व बाह्य जनननेंद्रियांमध्ये सूज आल्यामुळे जनावरास हालचाल करण्यास त्रास होतो. गर्भात जनावरांचा गर्भपात होऊ शकतो. बाधित जनावरे 2 ते 3 आठवड्यात बरी होतात.

यासाठी रोगी जनावरे वेगळी ठेवातीत, पशुवैद्यकांकडे जनावरांची तपासणी करावी, लक्षणानुसार उपचार करावे, जनावरांना तोंडावारे इंजेक्शन द्यावीत. लंपी रोग झाल्यास प्रादुर्भावग्रस्त भागापासून पाच किमीच्या परिसरातील गाय वर्गीय व म्हैसवर्गीय जनावरांना गोटपॉक्स लस 1 मिली नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जावून टोचावी.

अधिक माहितीसाठी उपायुक्त पशुसंवर्धन कार्यालयाच्या 07184-252413 वरसंपर्क साधावा, असे उपायुक्त पशुसंवर्धन कार्यालय, भंडाराने कळवले आहे.

शैलजा वाघ-दांदळे                                                    जिल्हा माहिती अधिकारी भंडारा