यशकथा -5 मनरेगा योजनेअंतर्गत गाईचा गोठा व दूध उत्पादनातून कुटुंबसमृद्धी

यशकथा -5 मनरेगा योजनेअंतर्गत गाईचा गोठा व दूध उत्पादनातून कुटुंबसमृद्धी

 

शासकीय योजनेचा योग्य पध्दतीने लाभ घेतला तर अल्प भुधारक शेतकरी ही समृध्दी साधू शकतो शिवपाल सपाटे यांची ही यशकथा

 

मी शिवपाल झिबल सपाटे ग्रामपंचायत धोप तालुका मोहाडी जिल्हा भंडारा माझ्याकडे तीन एकर शेती असून मी शेतात धान पीक घेत होतो त्यामध्ये मला कुठलाही नफा त्यात दिसून येत नव्हता. मला 3 मुली आहेत त्याचे शिक्षण व लग्नकार्य करण्याचा प्रश्न माझ्यापुढे ठाकला होता. शेतीच्या भरवशावर मी त्यांचे लग्न करू शकत नव्हतो. त्याकरिता मला शेती विकणे हाच एकच पर्याय माझ्याकडे उरलेला होता. माझ्याकडे 2013-14 या वर्षात 3 गाई होत्या त्याच्यामार्फत मला दुधापासून 7 ते 8 हजार महिन्याचे उत्पन्न मिळत होते. एकेदिवशी मी आपल्याकडे असलेल्या गाईच्या संख्येत वाढ करून दूध उत्पादन घेण्याचा निश्चय मी केला.

 

याकरिता मी सर्वप्रथम पैशाची जुळवाजुळव करून आणखी 3 गाई घेण्याचे प्रयोजन केले. आता माझ्याकडे 6 गाई दुधाकरिता तयार झाल्या. परंतु गाई मला घरा बाहेर बांधावे लागत असे. थंडी, ऊन, वारा, पाऊस व रोगराई यांचा गाईना सामना करावा लागत असे मी पाहिजे त्याप्रमाणे स्वच्छता ठेऊ शकत नव्हतो त्यामुळे दूध उत्पादन सुद्धा तेवढे होत नव्हते.

 

ग्रामपंचायत येथील ग्राम रोजगार सेवक यांनी जनावरांसाठी गुरांचा गोठा नरेगा योजनेतून आपणास मिळू शकते याबाबत मला माहिती दिली. याकरिता आपल्याला काय काय करावे लागेल याबाबत मी रोजगार सेवक यांच्याकडून पूर्णपणे माहिती घेतली. ग्रामसभेद्वारे मी गाईच्या गोठ्याचे नाव मी नियोजन आराखड्यात दर्शविले ग्राम रोजगारसेवक यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास मला सांगितले. त्यानुसार मी कार्यप्रयोजन केले. माझ्या गोठयाचे प्राकलन तयार करण्यासाठी एक फाईल ग्रामपंचायतीकडून पंचायत समिती येथे सादर करण्यात आली. त्यावर तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. गुरांचा गोठा शेड तयार करण्यास मला गावातील सरपंच, ग्रामसेवक व ग्राम रोजगारसेवक त्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यानुसार मी गाईंचा गोठा बांधण्यास सुरवात केली.

 

मला सर्वप्रथम माझ्या 3 मुलीचे शिक्षण व लग्नकार्य करण्यासाठी दूध उत्पादनास चालना देऊन कुटुंब समृद्ध करणे हे माझे उद्दिष्ट होते. ज्यावेळेस माझ्याकडे 6 गाई होत्या. मला त्या घराबाहेर बांधावे लागत असे. गाईचा गोठा मला मिळाल्यानंतर थंडी, ऊन, वारा, पाऊस व रोगराई यांच्यापासून मुक्तता मिळाली व गाईच्या आरोग्यात सुधारणा झाली ज्यामुळे माझ्या दुधाचे उत्पादन वाढले.

 

आज जर मला नरेगा योजनेतून गुरांचा गोठा मिळाला नसता तर मी आपली वडीलोपार्जीत जमीन विकून माझ्या तीन मुलींचे लग्नकार्य मला करावे लागले असते. मला गोठा मिळाला त्यातून मला दूध उत्पादनातून समृद्धी कशी आणता येईल हे कळले. माझ्यासारखा दूध उत्पादनाचा मार्ग, शेळी व्यवसाय किंवा कुक्कुटपालन व्यवसाय युवक वर्गानी करावा व त्यातून आपले कुटुंब समृद्ध करावे हे मी गावातील युवकजणांना आवाहन करतो. यापुढे धान शेतीस बगल देऊन फळबागांची शेती करण्याचा माझा ध्यास आहे.

शैलजा वाघ दांदळे,

जिल्हा माहिती अधिकारी,भंडारा