मार्कंडादेव येथे ”आयुष्यमान भारत, आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष 2023, सरकारच्या विकासाचे आठ वर्ष, जी-२०, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” भव्य मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ

मार्कंडादेव येथे ”आयुष्यमान भारत, आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष 2023, सरकारच्या विकासाचे आठ वर्ष, जी-२०, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” भव्य मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ

खासदार अशोक नेते व आमदार देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या

केंद्रीय संचार ब्यूरो, विभागीय कार्यालय,पुणे व क्षेत्रीय कार्यालय वर्धाचा उपक्रम

गडचिरोली (सीबीसी, वर्धा)दि. 17 फेब्रुवारी : भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, विभागीय कार्यालय, पुणे, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, जिल्हा प्रशासन, गडचिरोली व जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली यांच्या सहकार्याने चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परिसर येथे आयोजित केलेल्या ”आयुष्यमान भारत, आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष 2023, सरकारच्या विकासाचे आठ वर्ष, जी२० व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या विषयांवरील भव्य मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन खासदार अशोक नेते व आमदार देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थित झाले.

याप्रसंगी अतिरिक्त पोलिस अधिक्षक कुमार चिंता, मार्कंडादेव येथील सरपंच संगीता राजू मोगरे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे मुंबई प्रकाशन विभागाचे उपसंचालक उमेश उजगरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, तहसिलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ, केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी तथा क्षेत्रीय कार्यालय नागपूरचे सहायक संचालक हंसराज राऊत, बालविकास प्रकल्प अधिकारी गजानन भांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील वरघंटे, प्रकाश गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी खासदार अशोक नेते म्हणाले की, भारत सरकारने जनतेच्या विकासासाठी निर्माण केलेल्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक कुटुंबांपर्यंत पोहचत आहे. विशेषतः मागास भागात सरकारकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य सुविधेचा लाभ जनतेला देण्यात येत आहे. गरीब व वंचित नागरीकांनी या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रदर्शनाला नागरीकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन सरकारच्या विविध योजनांची माहिती जाणून घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार देवराव होळी म्हणाले की, मार्कंडादेव यात्रेच्या ठिकाणी केंद्र सरकारने अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करून जनतेसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती जनतेपर्यंत पोहचत आहे. याच बरोबर आयुष्यमान योजना, जी २० व आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्षाच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी खूप छान उपक्रम सरकारच्या माध्यमातून आयोजित केला गेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागरीकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेटी देऊन विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी सरकारच्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हा खून छान उपरक्रम आयोजित केला आहे. हे उपक्रम नेहमी आयोजित करून लोकांपर्यंत सरकारच्या विविध योजनांची माहिती पोहचावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या प्रदर्शनात भारत सरकारने केलेल्या विविध विकास कामांची माहिती सांगणारे सचित्र छायाचित्र प्रदर्शन, तसेच डिजीटल वॉल, एलएडी टिव्हीवर चलचित्र स्वरूपात माहिती असणारे विविध चित्रपट/माहिती पट ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर भारत सरकारच्या पब्लिकेशन डिव्हीजन व जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोलीद्वारे पुस्तकांचे प्रदर्शन ठेवण्यात आली आहेत. तसेच आरोग्य विभाग, गडचिरोली मार्फत नागरीकांसाठी आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे. आरोग्याची माहिती सांगणारे विविध स्टॉल, मतदार जनजागृती, कृषी विभाग व पंचायत समिती, प्रधानमंत्री घरकुल योजना, एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प यांच्यासह विविध सरकारी विभागांचे स्टॉल ठेवण्यात आले आहेत.

यावेळी महिला व बालविकास विभाग, जि.प. गडचिरोली मार्फत पंचायत समिती व एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प यांच्याकडून अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्यासाठी पोष्टिक आहार स्पर्धा घेण्यात आली. त्यात विजेत्या अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सुभेदार रामजी कलापथक यांच्यामार्फत विविध लोककला सादर करून जनतेमध्ये विविध सरकारी योजनांबाबत जनजागृती काम करण्यात आले. सदर प्रदर्शन २१ फेब्रुवारी 2023 परर्यंत सकाळी ८ ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार आहे.

प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी तथा सहायक संचालक हंसराज राऊत यांनी केले. संचालन सोलापूरचे क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव यांनी केले. तर आभार जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ यांनी मानले.