NMMS परीक्षेत मनपा शाळेचे २९ विद्यार्थी उत्तीर्ण गुणवत्ता यादीत असल्यास मिळणार शिष्यवृत्ती

NMMS परीक्षेत मनपा शाळेचे २९ विद्यार्थी उत्तीर्ण

गुणवत्ता यादीत असल्यास मिळणार शिष्यवृत्ती

 

चंद्रपूर १४ फेब्रुवारी – NMMS (National Means-cum-Merit Scholarship Scheme ) परीक्षा म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेचे २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन जर गुणवत्ता यादीत आले तर त्यांना सलग ४ वर्षेपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात मनपा शाळा आपला दर्जा सतत उंचावत असुन मनपा शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहीत करत असतात. या परीक्षेसाठीही शिक्षकांचे पुर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले होते. सदर परीक्षेत सत्र २०२०-२१ मध्ये मनपा शाळेचे ३ विद्यार्थी , सत्र २०२१-२२ मध्ये १५ विद्यार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते तर आता २०२२-२३ मध्ये २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षीक १२,०००/- एवढी शिष्यवृत्ती सलग ४ वर्षे म्हणजे इयत्ता ८ वी ते १२ वी एकुण ४८,०००/-रु शिष्यवृत्ती मिळते. १२ वी पर्यंत शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ मिळतो.इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.

सन २००७-०८ पासुन आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना ही मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्सेस भारत सरकारमार्फत राबविली जात आहे. इयत्ता ०८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या NMMS योजनेचे उद्दिष्ट आहे.

मनपा सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत,वर्गशिक्षिका उमा कुकडपवार, विशेष शिक्षक जोगेश्वरी मोहारे,शिवलाल इरपाते,सचिन रामटेके यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना हा टप्पा गाठण्यास मदत मिळाली आहे.