अल्पसंख्याक लाभार्थींना लघु व्यवसायाकरीता मुदत कर्ज योजनेसाठी ४१७ अर्ज प्राप्त

अल्पसंख्याक लाभार्थींना लघु व्यवसायाकरीता

मुदत कर्ज योजनेसाठी ४१७ अर्ज प्राप्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार मौलाना आझाद महामंडळाच्या योजनेला प्रतिसाद

मुंबई, दि. 7 : राज्यातील अल्पसंख्याक समुहातील घटकांसाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत लघु व्यवसायासाठी राबविण्यात येत असलेल्या मुदत कर्ज योजनेकरीता अर्ज करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीदिनी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी आवाहन केले होते. त्यानुसार 18 जानेवारी २०२३ पर्यंत सर्व जिल्ह्यांमधून ४१७ अर्ज प्राप्त झाले असून यातील पात्र लाभार्थींना लवकरच कर्ज वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख यांनी दिली.

महामंडळामार्फत ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे या अर्जांची छाननी करण्याचे काम सुरु आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांना २ महिन्यात मंजुरीपत्र निर्गमित करण्यात येत आहेत, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवंम वित्त निगम यांच्याकडून कर्ज स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजना व इतर योजनांसाठी अर्ज करण्याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आवाहन केले होते. त्यानुसार महामंडळाची जिल्हा कार्यालये तसेच मुख्यालयात इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व अर्जांवर प्रक्रिया करण्यात येत आहे.

व्यक्ती, दलाल यांच्या प्रलोभनास बळी पडू नये

मंजुरी पत्र निर्गमित केलेल्या अर्जदाराने कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कर्जाची रक्कम संबंधित अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे. तसेच कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. कर्ज मंजुरीसाठी व कर्जाची रक्कम प्राप्त किंवा वितरित करण्यासाठी महामंडळामार्फत कोणत्याही प्रकारचे शुल्क, फी आकारण्यात येत नाही. लाभार्थींनी कोणत्याही व्यक्ती, दलाल यांच्या प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन डॉ. शेख यांनी केले आहे.

या योजनेसाठी अजूनही अर्ज स्वीकारण्यात येत असून इच्छुकांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात किंवा ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथील मुख्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन डॉ. शेख यांनी केले आहे. महामंडळाच्या कार्यालयांची यादी, पत्ते, संपर्क क्रमांक महामंडळाच्या https://www.mamfdc.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.