चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मिळणार हक्काची घरे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मिळणार हक्काची घरे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केल्या मान्य

मुंबई, दि. 7 : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना “सर्वांसाठी घरे” योजनेत घरे, तसेच वैमानिक प्रशिक्षण यासह महत्वाचे निर्णय आज घेण्यात आले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या सूचनांवर आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी हे निर्णय घेतले आहेत.

 

दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूर महसूली विभागाची जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम प्रारुप आराखडा २०२३-२४ संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यासंदर्भात पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चार महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या होत्या. आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी या सर्व सूचना तत्काळ स्वीकारल्या.

 

या निर्णयांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील कोलम समाजातील आदिवासी बांधवांना “सर्वांसाठी घरे” या योजनेतंर्गत घरकुले उपलब्ध करुन देण्यात येतील. या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकताही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मांडली होती. त्यावरही योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्र्यांनी दिले आहे.

 

जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना चंद्रपूर फ्लाईंग क्लब येथे वैमानिक प्रशिक्षण देण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

 

त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रामधून प्लग अँड प्ले युनिटसाठी आदिवासी विभाग वित्तीय साहाय्य उपलब्ध करून देणार आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील स्वत:ची घरे नसणाऱ्या आदिवासी बांधवांना ‘ड’ गटाचा विचार न करता घरे बांधून देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.