22 ऑगस्ट रोजी नुकसानग्रस्त झालेल्या पिक क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी

22 ऑगस्ट रोजी नुकसानग्रस्त झालेल्या पिक क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी

· जिल्हास्तरीय समितीतीद्वारे पिक क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी

· पिकांचे नुकसान होऊ नये या करीता मार्गदर्शन

भंडारा, दि. 25 : जिल्हयातील 1 जुलै ते 17 ऑगस्ट दरम्यान आलेल्या अतिवृष्टीमुळे व पूरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिक क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी 22 ऑगस्ट रोजी करण्यात आली असून पिक पाहणीला कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्र आणि कृषि संशोधन केंद्र, साकोली येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा उपविभागीय कृषि अधिकारी, भंडारा, उपविभागीय कृषि अधिकारी, साकोली, संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, क्षेत्रिय कर्मचारी व पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

पाहणीत भात व इतर पिके (भाजीपाला, तुर ई.) हि 3 पेक्षा अधिक दिवस पुर्णपणे बुडित राहिल्याने व पिकांवर गाळ साचल्याने या पिकांचे बहूतेक ठिकाणी पुर्णत: नुकसान झाले व पिक सडल्याचे आढळले. ज्या ठिकाणी पिके दोन ते तीन दिवस पाण्याखाली राहिले (विशेषत: भात) त्या पिकांचे सुध्दा फार नुकसान आढळून आले आहे. काही ठिकाणी नदीकाठच्या अथवा नाल्याकाठच्या भागात पाण्याला जोर असल्याने काही ठिकाणी भात खाचरानमध्ये गाळ/ रेती साचुन पिकांचे नुकसान झाले आहे. भंडारा तालुक्यात वैनगंगा नदीकाठावरील शेतात मोठया प्रमाणात जलकुंभी व इतर तणवर्गीय वनस्पती सुद्धा येऊन या वनस्पतीमुळे शेते झाकली गेलेली आहेत. समितीने केलेल्या पाहणीत आढळलेल्या बाबीनुसार शेतकऱ्यांना पिकांचे अधिक नुकसान होऊ नये व नुकसानबाधित क्षेत्रात कोणती पिके घ्यावी याबाबत खालील मार्गदर्शन केले आहे.

भात बांध्यामध्ये खोलगट भागात जिथे पाणी साचले आहे व पिकांचे नुकसान अपेक्षित आहे अशा बांध्यामधून/ शेतातून पाण्याचा निचरा करावा, ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे केवळ अशा शेतकऱ्यांनी पुनश्च लवकर येणाऱ्या भातांच्या वाणांची (को-51, MTU-1010 इ.) लागवड करण्यास हरकत नाही. मात्र या जाती थंडीत सापडल्यामुळे त्याचा कालावधी 10 ते 15 दिवसानी वाढण्याची शक्यता आहे, कमी कालावधीच्या भाताच्या वाणांची लागवड करतांना चिखल केलेल्या शेतात पाण्याचा निचरा करून अंकुरीत बियाणे ड्रम सिडर किंवा फेकीव (कवडोक) पध्दतीने पेरावे व पुढिल 4 ते 5 दिवस बांधीत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व पक्षांपासून पिकांचे संरक्षण करावे, शेतकऱ्यांपाशी भाताची रोपे उपलब्ध असल्यास व ती जास्त दिवसांची रोपे असल्यास त्या रोपांची शेंडे खुडून प्रती चुड 4-5 रोपांची, रोवणीचे अंतर कमी करून, दाट लागवड करावी. तसेच पिकास प्रचलित खत मात्रेपेक्षा खत मात्रा वाढवून दयावी, पूर ओसरलेल्या ठिकाणी बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत जीवंत असलेल्या धान पिकांची वाढ सुधारण्यासाठी व जोमदार होण्यासाठी पिकावर 2 टक्के DAP + 1 टक्के MOP ची फवारणी करावी. शेतकऱ्यांनी रोवणी वेळी झिंक सल्फेटचा डोस दिला नसल्यास 25 किलो/हे. झिंक सल्फेट दयावे. व नत्र युक्त खतांचा शिफारशी प्रमाणे दुसरा डोस दयावा, पूराच्या पाण्यामुळे किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे जिथे धान लागवड विरळ झाली आहे अशा ठिकाणी फुटवे जास्त असलेल्या थोंबातून कोवळे फुटवे काढून खाडे भरावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी रोपावरून पूराची माती घालविण्यासाठी पॉवर स्प्रेयरचा वापर करून स्वच्छ पाण्याचा फवारा करावा, शेतामध्ये सततच्या पाण्यामुळे बुरशीजन्य तसेच जीवाणूजन्य रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव वाढल्याची शक्यता असल्याने करपा रोगासाठी हेक्झाकोनॅझोल 5 टक्के ई.सी. @20 मि.ली. किंवा मेंकोझेब 75 टक्के प्रवाही @ 30 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कडाकरपा रोगासाठी कॉपर हैड्रॉक्साईड 53.8 टक्के डी एफ @ 30 ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन @ 1.5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 20 प्रमाणे कामगंध सापळे लावावे. ट्रायकोग्रॅामा जापोनिकम (ट्रायकोकार्ड) हे परपजीवी किटक हेक्टरी 50,000 अंडी याप्रमाणात दर 7 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 वेळा सोडावे. शेतात 10 टक्के किडग्रस्त फुटवे दिसता क्लोरॅनट्रार्नीलीप्रोल 0.4 टक्के दाणेदार @ 10 कि.ग्रॅ किंवा कारटॅप हायड्रोक्लाराईड 4 जी @ 18 कि.ग्रॅ. किंवा फीप्रोनिल 0.3 जी @ 25 कि.ग्रॅ. प्रती हेक्टर बांधामध्ये पाणी असतांना टाकावे किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 टक्के एस.सी @3 मि.ली. प्रती 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी पिकाची या खरीप हंगामात नविन लागवड करणे शक्य नाही अशा ठिकाणी रब्बी हंगामात जवस, करडई, हरभरा, मोहरी, मका, ज्वारी, सोनबोरू, तिळ या पिकांच्या लागवडीचे नियोजन करावे.