काळया फिती लावून नागरी समितीने कारंजा जि.प. बांधकाम विभागाला दिले स्मरणपत्र (आचारसंहिता संपताच नागरी समिती करणार सत्याग्रह )

काळया फिती लावून नागरी समितीने कारंजा जि.प. बांधकाम विभागाला दिले स्मरणपत्र

(आचारसंहिता संपताच नागरी समिती करणार सत्याग्रह )

कारंजा ( घा.) जलशुद्धीकरण केंद्रापासून ते महामार्ग क्रमांक सहा पर्यंत बिहाडी-मदनी रोडचे नूतनीकरण ताबडतोब करण्यात यावे या मागणीचे स्मरणपत्र काळया फिती लावून उप अभियंता जि. प. बांधकाम विभाग, उपविभाग कारंजा (घा) यांना कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने दिले आहे.

बिहाडी येथील विद्यार्थी व नागरिकांनी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीच्या नेतृत्वात एक महिन्यापूर्वी सदर समस्ये संदर्भात निवेदन देऊन रोडच्या नूतनीकरणाची मागणी केली होती. परंतु अजून पर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यामुळे निषेध दर्शवत स्मरण पत्र देऊन पुढील पंधरा दिवसात काम सुरू करावे. अन्यथा आचारसंहिता संपताच बिहाडी रोडवर सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा नागरी समितीने प्रशासनाला दिला आहे.

कारंजा शहरातून बिहाडी व मदनी या गावाला जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे. बिहाडी व मदनी मार्गाने कारंजा मध्ये प्रवेश करताना जलशुद्धीकरण केंद्रापासून ते महामार्ग क्रमांक सहा पर्यंत हा रस्ता पूर्णतः उखडलेले आहे.त्या रस्त्याने मोठ – मोठे खड्डे पडलेले आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था आहे. त्यामुळे रोडची अक्षरश: चाळण झालेली आहे. या रोडने विद्यार्थी व नागरिकांना जाणे – येणे करतांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या गावातील बरेचसे विद्यार्थी कारंजा मध्ये शिक्षण घेण्याकरीता सायकलने शाळेत येतात. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे विद्यार्थ्यांना नीट सायकल सुद्धा चालवता येत नाही. अनेकदा या खड्ड्यामुळे विद्यार्थ्यांना इजा पोहोचलेल्या आहेत. बऱ्याचदा नागरिक गाडी घेऊन या रस्त्याने पडल्याचे प्रसंग घडलेले आहे. तसेच कारंजातील खर्डीपुरा या भागातील नागरीक व शेतकरी सुद्धा याच मार्गाचा वापर करतात, शेती उपयोगी बंडी- बैल, गाई, म्हशी यांची ये – जा सुद्धा याच मार्गाने असते, नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांना जलशुद्धीकरण केंद्रामध्ये सुद्धा याच मार्गाने जावे लागते, कार प्रकल्पावर जायला सुद्धा हाच मार्ग आहे.

त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना होणारा त्रास व संभाव्य धोके लक्षात घेता पुढील १५ दिवसात ताबडतोब सदर रोडचे नूतनीकरण करण्यात यावे. अन्यथा सदर स्मरण पत्राची प्रशासकीय स्तरावर दखल घेतल्या गेली नाही तर सदर मागणी करीता सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग कारंजा येथील सहाय्यक स्थापत्य अभियंता श्री आशिष फडफड यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देतेवेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी, बिहाडी येथील नागरिक व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.