” एक कोटीची विद्युत शवदाहिनी धूळखात ” या मथळ्याखाली प्रसिद्ध वृत्ताचा खुलासा

” एक कोटीची विद्युत शवदाहिनी धूळखात ” या मथळ्याखाली प्रसिद्ध वृत्ताचा खुलासा

 

चंद्रपूर १२ जानेवारी – चंद्रपूर शहरातील बाबुपेठ स्मशानभुमी येथे एल.पी.जी वर चालणारी शवदाहिनी कोव्हीड काळात मृतकांची मोठ्या प्रमाणात संख्या लक्षात घेता उभारण्यात आली. सदर शवदाहिनी सुस्थितीत असुन वापरास योग्य आहे मात्र शवदाहिनीचा वापर करण्यास नागरीकांचा मात्र प्रतिसाद अल्प आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना अंत्यविधीकरीता रु.२०००/- सानुग्रह अनुदान देण्यात येत असुन या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरीकांकडून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यास रु. ५००/- शुल्क आकारण्यात येते व इतर नागरीकांकडून रु.२५००/- शुल्क आकारण्यात येते.एल.पी.जी वर चालणाऱ्या शवदाहिनीचा वापर करण्यास नागरीकांचा मात्र प्रतिसाद अल्प आहे.सदरील शवदाहिनी कमी शुल्कामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे नागरीकांनी याचा वापर करण्याचे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे.

शवदहनासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा लागतो. त्यासाठी जंगलतोड होत असते. शिवाय लाकडाद्वारे करण्यात येणाऱ्या शवदहनामुळे वातावरणात प्रदूषण होते. एलपीजी गॅसच्या शवदहनातून वातावरणात प्रदूषण कमी होते. एलपीजी गॅसवरील शवदाहिनीमुळे कार्बनचे प्रमाण कमी होऊन झाडे ही कापण्यापासून वाचतात. त्यासाठी बाबुपेठ प्रभागातील या स्मशानभूमीत ही शवदाहिनी लावण्यात आली. चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडून शवदाहिनीची देखभाल दुरुस्त खर्च, एलपीजी सिलेंडर खर्च, वीज खर्च, मजूर खर्च आदीचा खर्च केला जातो. मनपा हद्दीतील नागरिकांना सेवा देण्याच्या दृष्टीने माफक शुक्ल निश्चित करण्यात आले आहे.

बाबुपेठ प्रभागातील समशानभूमी परिसरात कंपाऊंड वॉल, क्रिमेशन शेड व पाथवे तयार करण्याकरीता नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रु.१०२.०८ लक्ष रकमेचा प्रस्ताव तयार करून मंजुरीकरीता सादर करण्यात आलेला आहे. मंजुरी व निधी प्राप्त झाल्यास कामास लवकरच सुरवात करण्यात येणार आहे.