लसीकरणात आशा वर्कर आणि परिचारकांची भूमिका महत्त्वाची : महापौर राखी संजय कंचर्लावार राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त परिचारिका व आशा वर्कर यांचा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने सत्कार

लसीकरणात आशा वर्कर आणि परिचारकांची भूमिका महत्त्वाची : महापौर राखी संजय कंचर्लावार
राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त परिचारिका व आशा वर्कर यांचा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने सत्कार
 
चंद्रपूर | लसीकरण मोहिमेत आशा वर्कर आणि परिचारकांची भूमिका महत्त्वाची असून, नागरिकांमध्ये असलेले गैरसमज प्रत्येकवेळी दूर करण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. जेई लसीकरण, कोरोना, पोलिओ लसीकरण यात सिंहाचा वाटा आहे. त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.
 
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 16 मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त परिचारिका आणि आशा वर्कर यांना महापौर राखी संजय कंचर्लावार व मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
 
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल परिचारिका आणि आशा वर्कर यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू यांनी केले.