वाहतुकीचे नियम आपल्या सुरक्षेसाठीच – जिल्हाधिकारी विनय गौडा

वाहतुकीचे नियम आपल्या सुरक्षेसाठीच – जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø 34 व्या रस्ता सुरक्षा अभियानचा शुभारंभ

 

चंद्रपूर, दि. 11 : रस्ते अपघातात देशात दरवर्षी लाखो लोकांचा जीव जातो. चंद्रपूर जिल्ह्यातही 2022 मध्ये जवळपास 400 मृत्यु झाले आहेत. यात विना हेल्मेट दुचाकी चालविणा-यांचा मृत्युचा आकडा 242 आहे. हे अपघात आपण थांबवू शकलो असतो. मात्र त्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे नियम आपल्या सुरक्षेसाठीच आहे, याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

 

उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने 34 व्या रस्ता सुरक्षा अभियानचा शुभारंभ करतांना उद्घाटक म्हणून ते बोलत होते. नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, सा.बा. अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक स्मिता सुतावणे, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आदी उपस्थित होते.

 

प्रत्येक जीव अमुल्य आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले की, एकदा जीव गेला तर तो परत येत नाही. आपली सुरक्षा ही आपल्याच हातात आहे. अपघातामध्ये जीव गमाविलेल्या कुटुंबाची जी हानी होते, त्याची भरपाई कशातच होऊ शकत नाही. गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या अपघातामध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यु हे दुचाकीस्वारांचे झाले आहेत. त्यामुळे हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करणे, गतीवर नियंत्रण ठेवणे, वाहन चालवितांना मोबाईलचा उपयोग न करणे, मद्यप्राशन करून वाहन न चालविणे आदी नियमांचे सर्वांनी पालन करावे. तसेच रस्ता सुरक्षा नियमांबाबत आपले मित्र, नातेवाईक व परिसरातील लोकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू म्हणाल्या, 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांकडे दुचाकी असते. मात्र गाडी चालविण्याचा परवाना आणि हेल्मेट राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नियमात राहून वाहन चालवा. एकही जीव विनाकारण रस्त्यावर वाया जाऊ नये, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्वत: नियमांचे पालन करा व इतरांनाही सांगा, असे त्या म्हणाल्या. अधिक्षक अभियंता श्री. गाडेगोणे म्हणाले, आता रस्ते अतिशय गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवा. रस्त्याच्या बाजुला लावलेल्या फलकावरील सूचनांचे पालन करा. विभागीय नियंत्रक श्रीमती सुतावणे म्हणाल्या, एस.टी. महामंडळातसुध्दा 11 ते 25 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. एस.टी. चे अपघात कमी करण्यासाठी चालक – वाहकांची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच विना अपघात सेवा देणा-या कर्मचा-यांचा विशेष सत्कारसुध्दा केला जातो. शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांनी बसमध्ये जागा पकडण्यासाठी विनाकारण घाई करू नये. त्यामुळे अपघात सुद्धा होऊ शकतो. बल्लारपूर आणि वरोरा बसस्थानकावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. आपल्या बसला वेळ असेल तर विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सुतावणे यांनी केले.

 

रस्ता सुरक्षा ही सामाजिक चळवळ होणे आवश्यक – आरटीओ किरण मोरे

 

रस्ता सुरक्षा अभियान हा उपक्रम दरवर्षी जानेवारीत राबविण्यात येत असला तरी याबाबत वर्षभर जनजागृती केली जाणार आहे. युवकांमध्ये रस्ता सुरक्षेबद्दल प्रबोधन होणे आवश्यक असून ही एक सामाजिक चळवळ व्हावी, असे प्रतिपादन प्रास्ताविकातून उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले. रस्त्यावरील अपघात हे मानव निर्मित आहे. ते आपल्याला टाळता येऊ शकतात. त्यासाठी नियमांचे पालन आवश्यक आहे. परिवहन कार्यालयाच्यावतीने प्रत्येक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करण्यात येईल. चंद्रपूर जिल्हा अपघात मुक्त किंबहुना अपघातांची संख्या कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपस्थितांना अमोल मांढळे यांनी नियमांचे पालन करणारी प्रतिज्ञा दिली.

 

तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वाहतुक नियमांची माहिती असलेल्या जनजागृतीपर पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अनकर नशीरखान यांनी तर आभार वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी मानले. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम, मोटार निरीक्षक अमोल मांढळे यांच्यासह परिवहन विभागाचे इतर अधिकारी, विद्याविहार महाविद्यालय व भवनजीभाई महाविद्यालयाचे विद्यार्थी, ऑटो रिक्षा चालक, ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.