अपघात टाळण्यासाठी वाहन धारकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे-जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

अपघात टाळण्यासाठी वाहन धारकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे-जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

· सर्व शासकीय कार्यालयात हेल्मेट सक्ती

· पादचाऱ्यांनी रस्त्यावर उजव्या बाजूने चालावे Walk On Right

 

भंडारा, दि. 11 : अपघात टाळण्यासाठी वाहन धारकांनी वाहन चालवितांना रस्ता रूरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करणे अपेक्षित असून स्वत: व इतरांच्या आयुष्याची काळजी घ्यावी. दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेट आणि चार चाकी वाहन चालवितांना सिट बेल्ट वापरावे, पादचाऱ्यांनी रस्त्यावर उजव्या बाजूने चालावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

 

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीयय महामार्ग प्राधिकरण विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान 2023 च्या उद्घाटन समारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. डि.के.सोयाम, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांच्यास‍ह वाहतूक, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रमुख उपस्थित होते.

 

रस्ते अपघातांची व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही बाब निश्चितच गंभीर आहे. अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. कुटुंबातील करता व्यक्ती अपघातात दगावल्यामुळे कुटुंबावर विपरीत परिणाम होतो. अपघातामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्य व नेत्र तपासणी करणेही आवश्यक आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षात अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून 2018 ते 2022 पर्यंत जिल्ह्यात एकूण 1900 अपघात झाले. या अपघातात 700 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 1000 गंभीर जखमी झाले. 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच यात जास्त प्रमाण आहे. दर वर्षी 140 व्यक्तींचा मृत्यू तर 200 गंभीर जखमी होतात. महिलांन पेक्षा पुरूषांचे प्रमाण 8 ते 10 पट जास्त आहे. सरासरी 60 पादचाऱ्यांचा दर वर्षी वाहन चालकांच्या चुकीने मृत्यू किंवा अपघात होतो. तसेच दर वर्षी 200 मोटर सायकल चालकांचा मृत्यू झाल्याचे निर्देशनास आले. फक्त हेल्मेटचा वापर न केल्याने 200 मोटर सायकच चालकांचे जिव जाणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. यावर उपाययोजना म्हणून सर्व शासकीय कार्यालयात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे, असे ही जिल्हाधिकारी यांनी यावेळी नमुद केले.

 

वाहतूक विभाग, परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती उपक्रम नियमित राबवावे. रस्ते अपघाताची आकडेवारी चिंताजनक असून अपघात कमी करण्यासाठी वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षा नियमांची अंमलबजावणीसाठी कडक पाऊले उचलावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा विषयक बॅनर व पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले तसेच सर्व उपस्थितांनी रस्ता सुरक्षा बाबत नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी केले तर आभार सहाय्यक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी मानले.