प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 30 कोटी 8 लक्ष रुपये अनुदानाचे वाटप

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत जिल्ह्यात

आतापर्यंत 30 कोटी 8 लक्ष रुपये अनुदानाचे वाटप

 

चंद्रपूर, दि. 05 : प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात सन 2017 ते 2023 पर्यंत एकूण 73,875 इतक्या लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 65,744 लाभार्थ्यांना एकूण रु. 30 कोटी 8 लक्ष 30 हजार इतक्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

 

भारतातील दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजूरीसाठी काम करावे लागते. तसेच प्रसूतीनंतर शारीरीक क्षमता नसतांनाही मजूरीसाठी तात्काळ काम करावे लागते. त्यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे देशाच्या मातामृत्यू व बालमृत्यू दरात वाढ होते. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहीत करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे, माता व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित रहावा, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात दि. 1 जानेवारी 2017 पासून कार्यान्वित केली आहे.

 

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 100 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता रु. एक हजार, किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या 6 महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता रु. दोन हजार लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल्या जाईल. प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकाला पेन्टा तिसरा लसीकरण दिल्यानंतर तिसरा हप्ता रु. दोन हजार लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

 

ही योजना सर्व स्तरातील महिलांना लागू आहे. परंतू, वेतनासह मातृत्व रजा घेणाऱ्या महिलांना ही योजना लागू राहणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे लाभार्थ्याचे आधार कार्ड, पतीचे आधारकार्ड, बँक खाते, माता बाल संरक्षण कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्हयात या योजनेची प्रभावीपणे व यशस्वीरित्या अंमलबजावणी सुरु असून वर्ष 2022-23 या कालावधीत एकूण 9850 लाभार्थ्याची नोंदणी करण्यात आली. यात 3 कोटी 37 लक्ष 64 हजार इतके अनुदान लाभार्थ्याला डिबीटी प्रणालीद्वारे खात्यात जमा करण्यात आला आहे. तसेच सन 2017 ते 2023 पर्यंत एकूण 73875 इतक्या लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 65744 लाभार्थ्याना एकुण रु. 30 कोटी 8 लक्ष 30 हजार इतक्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.