ओबीसी महामंडळाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा Ø राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे निर्देश

ओबीसी महामंडळाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

Ø राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे निर्देश

चंद्रपूर, दि. 8 : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गाचा सर्वांगीण विकास व स्वयंरोजगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा व महामंडळाच्या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिल्या.

 

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती महामंडळ, समाज कल्याण आदी विभागांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, ओबीसी महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक दिपाली मांजरे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. आर. कुमरे, श्री. राठोड, प्रतिमा रामटेके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

जिल्ह्यात राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा मागासवर्गीय व वंचित घटकातील लाभार्थ्यांना लाभ प्राधान्याने मिळायला पाहिजे, असे सांगून श्री. अहीर म्हणाले, भविष्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांना व नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. काम करणाऱ्या महिलांसाठी वस्तीगृह ही चांगली योजना आहे. केंद्राचे वस्तीगृह राज्याराज्यात नाही. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.

 

श्री. अहीर पुढे म्हणाले, कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत भद्रावती येथील ग्रामोदय संघात ओबीसी प्रवर्गातील मुलांना मातीपासून कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण द्यावे. यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामोदय संघास भेट द्यावी. जिल्ह्यात ओबीसी व व्हिजेएनटीची वसतिगृहे किती ? केंद्राचा किती निधी मिळतो? सदर योजनांचा आतापर्यंत किती लाभार्थ्यांना लाभ मिळाला? आदींची माहिती त्यांनी घेतली. तसेच विविध महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहितीसुध्दा त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली

 

ओबीसी महामंडळाकडून उद्योगधंदे उभारणीकरीता छोट्या व्यावसायिकांसाठी आर्थिक मदतीच्या योजना राबविल्या जातात. तर इमाव प्रवर्गातील उच्च शिक्षणाकरीता शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविली जाते. तसेच थेट कर्ज योजना, बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण आदी योजना राबविल्या जात असल्याची माहिती इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक दिपाली मांजरे यांनी दिली.