अनुसूचित जाती संवर्गासाठीच्या शासकीय योजनांचा डेटाबेस तयार करणार – अमोल यावलीकर

अनुसूचित जाती संवर्गासाठीच्या शासकीय योजनांचा डेटाबेस तयार करणार – अमोल यावलीकर

Ø समता पर्वनिमित्त पत्रकार कार्यशाळेचे आयोजन

चंद्रपूर, दि. 30 : अनुसूचित जाती संवर्गासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. कोणत्या योजनेसाठी निकषानुसार कोण पात्र ठरू शकेल व संबंधित लाभार्थ्याच्या मागणीनुसार त्यांना योजना मंजूर करून त्याची अंमलबजावणी करता येणे शक्य व्हावे, यासाठी समाजकल्याण विभागामार्फत सर्व शासकीय योजनांचा संगणीकृत एकत्रित डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी आज पत्रकारांना दिली.

 

संविधान दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर) या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिनिमित्त दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व कार्यक्रमांची माहिती दिली.

 

सर्व शासकीय योजनांचा डाटाबेस तयार करण्याचा अशा प्रकारचा हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्याने सर्वप्रथम हाती घेतला असून हा जिल्ह्याचा अभिनव उपक्रम राहणार असल्याचे श्री. यावलीकर पुढे म्हणाले. समता पर्वनिमित्त जिल्ह्यात 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत प्रभात फेरी, संविधानासाठी चाला, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तज्ञांकडून मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, संविधानविषयक व्याख्याने, पोस्टर व बॅनर बाबत चित्रकला स्पर्धा, अनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवक यांची कार्यशाळा, युवा गटांची कार्यशाळा, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींना भेटी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी यांचेसाठी कार्यशाळा, लाभार्थींना विविध लाभाचे वाटप, जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदिवण्याचे आवाहन श्री. यावलीकर यांनी केले आहे.

कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी राजेंद्र बोरलावार, समाजकल्याण निरीक्षक मनोज माकोडे, गणेश खोटे, मंगला करमलकर, उषा मुंडे, हुजेफा शेख, उषा लोणकर, वैशाली ठाकरे, संतोष सिडावार, राहुल आकुलवार, रुपेश समर्थ तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.