भूमि अभिलेख विभागात सरळसेवा भरती

भूमि अभिलेख विभागात सरळसेवा भरती

 

भंडारा, दि. 21 :भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता दिनांक 9 डिसेंबर, 2021 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती.

 

त्यानुसार दिनांक 9 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. त्यानंतर सदर अर्जदार यांना विभागाकडून दिनांक 28 फेब्रुवारी ते 13 मार्च 2022 या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

 

छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येवून भूमि अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियामांनुसार जाहिरातील नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत. अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपुर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दिनांक 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत IBPS कंपनी मार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

 

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahabhumi.gov.in) लिंकवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे.

 

परीक्षा पध्दतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिता लिंक 14 नोव्हेंबर 2022 पासून विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख भंडारा कार्यालयाने कळविले आहे.