प्रलंबित पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी – जिल्हाधिकारी विनय गौडा

प्रलंबित पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी – जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø वरोरा व भद्रावती तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा

Ø वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान

चंद्रपूर, दि. 10 : पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने गावागावात दवंडी द्यावी. तसेच विशेष शिबीर आयोजित करून प्रलंबित प्रकरणातील शेतकऱ्यांकडून त्यांचे खाते क्रमांक प्राप्त करून त्यांना रकम अदा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी गुरूवारी दिल्या.

 

वरोरा व भद्रावती येथील तालुकास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या अध्यक्षतेखाली वरोरा उपविभागीय कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार रोशन मकवाने व इतर अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी यांनी पी. एम. किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे प्रलंबित इ-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे सांगून शासनाच्या 13 विविध महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.

 

वरोरा भद्रावती नगरपालिका यांचे विकासकामांचा आढावा घेतांना तेथील मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली तसेच घनकचरा व्यवस्थापनाची माहिती घेण्यात आली. नगरपालिकांनी उत्कृष्ट कामातून राज्यामध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

वनराई बंधारा बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे श्रमदान

वरोरा तालुक्यातील मौजे कळमगव्हाण येथे कृषी विभाग व गट ग्रामपंचायत कळमगव्हाण – तुळाणा यांचे पुढाकारातून लोकसहभाग व श्रमदानातून कोराडी नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला, यात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी देखील श्रमदान केले.

याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, तहसीलदार रोशन मकवाने, नायब तहसीलदार मधुकर काळे, तालुका कृषी अधिकारी गजानन भोयर, सरपंच मनिषा ढेंगळे, ग्रामपंचायत सदस्य राजीव आसेकर, समर्थ बोढे, पोलीस पाटील देवराव महाकुलकर, बंडू ढेंगळे, दीपक ताणले, ईश्वर आत्राम, रामभाऊ मेले, नितेश महाकुलकर, विजय मिलमिले, विजय बावणे, विजय देहारकर, नितीन बोढे व इतर ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले.