भंडारा जिल्ह्यातील 363 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

भंडारा जिल्ह्यातील 363 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

भंडारा, दि. 10 : नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती, तसेच मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 9 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर झाला आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील 363 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

 

7 नोव्हेंबर 2022 रोजीच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामधील दिलेल्या निर्देशानुसार भंडारा जिल्ह्यातील 50 टक्के पेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात 9 नोव्हेंबर 2022 पासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या कालावधीसाठी अंमलात राहील, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा प्रभारी अधिकारी (ग्रामपंचायत निवडणूक) श्रीपती मोरे यांनी कळविले आहे.

 

असा आहे प्रत्यक्ष राबविण्याचा निवडणूक कार्यक्रम

 

तहसीलदारांनी निवडणूक नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 नोव्हेंबर 2022 (शुक्रवार), नामनिर्देशन पत्र मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) 28 नोव्हेंबर (सोमवार) ते 2 डिसेंबर (शुक्रवार) सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत, नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ 5 डिसेंबर (सोमवार) सकाळी 11 वाजतापासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ 7 डिसेंबर (बुधवार) दुपारी 3 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ 7 डिसेंबर (बुधवार) दुपारी 3 वाजतानंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 18 डिसेंबर (रविवार) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजतापर्यंत, मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिका-यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील) 20 डिसेंबर (मंगळवार), जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसुचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 23 डिसेंबर 2022 (शुक्रवार) राहील.