राजूरा येथे जिल्हाधिका-यांच्या हस्ते राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन

राजूरा येथे जिल्हाधिका-यांच्या हस्ते राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन

Ø महिला बचत गटामार्फत होणार ध्वजविक्री

चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात आणी आपल्या इतिहासातील हुतात्म्याचे स्मरण व्हावे, यासाठी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राजूरा नगर परिषदतर्फे स्वराज्य महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे.

शासनाच्या सूचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर झेंडा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत महिला बचत गटामार्फत राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीश गाडे, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत पिदुरकर, संवर्ग विकास अधिकारी श्री. भिंगारदिवे, नेफडो संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष बादल बेले यांची उपस्थिती होती.

या अभियानांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने आणि स्वखर्चाने आपापल्या घरावर राष्ट्रध्वज उंचाविणे अपेक्षित आहे. तसेच या तीन दिवसात नागरिकांना आपल्या घरावरील ध्वज रात्रीसुद्धा कायम ठेवता येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक न. प. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी केले. संचालन प्रशासकीय अधिकारी विजयकुमार जांभूळकर, तर आभार पाणी पुरवठा विभागाचे अभियंता संकेत नंदवंशी यांनी मानले. यावेळी अभियंता आदित्य खापणे, कर निरीक्षक उपेंद्र धामंगे, लेखापाल अश्विनकुमार भोई, अभिनंदन काळे, रवींद्र जामूनकर, प्रीतम खडसे, सनप जोशी, अक्षय सूर्यवंशी यांच्यासह नगर परिषद कार्यालय राजुरा येथील सर्व अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.