जिल्हाधिकारी संजय मीणा यांची सिरोंचा तालुक्यात पूरबाधित भागाला भेट \पोलीस अधीक्षक, मुख्य कार्याकारी अधिकारी होते उपस्थित

जिल्हाधिकारी संजय मीणा यांची सिरोंचा तालुक्यात पूरबाधित भागाला भेट..

तालुकास्तरीय प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे दिले आदेश

 पुरानंतर येणारे जलजन्य आजार, साथरोग रोखण्यासाठी उपाययोजनांबाबतही घेतला आढावा

पोलीस अधीक्षक, मुख्य कार्याकारी अधिकारी होते उपस्थित

गडचिरोली, दि.१६ : जिल्हयातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुरामूळे दहा हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले होते. याच धर्तीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना पूरबाधित क्षेत्रात राबविण्यात येत आहेत. याचा आढावा घेण्यासाठी व पूरामूळे बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सिरोंचा येथे भेट दिली. यावेळी त्यांचे सोबत पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाच्या नियोजनाबाबत आढावा घेतला व पूरबाधित क्षेत्राची सिरोंचा येथे पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी झालेल्या नुकसानीचा सर्वे करून तातडीने पंचनामे करावेत अशे आदेश तालुका प्रशासनाला दिले.

यावेळी संजय मीणा यांनी पुरानंतर येणारे जलजन्य आजार, साथरोग रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यासाठी सूचना केल्या, गावातील पाण्याचे स्त्रोत निर्जंतुक करून आरोग्यविषयक गावोगावी तपासण्या राबविण्याच्या सूचना केल्या. जिल्हा प्रशासनाकडून काही प्रमाणात आवश्यक साहित्य पुरबाधितांना देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक मदत हवी त्या ठिकाणी तातडीने मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. गरोदर मातांची तपासणी करून त्यांना आरोग्य विभागाने विशेष काळजी घ्यावी, गावातील ईलेक्ट्रीसीटी पुर्ववत करणे, दूरध्वनी सेवा कार्यान्वित करणे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्पदंश काळजी, नागरिकांनी विनाकारण नदी नाल्यावर जावू नये, सेल्फीचा मोह आवरावा, पुलावरून पाणी जात असताना पूर ओलांडु नये अशा सूचनाही पूरबाधितांना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा प्रशासनातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी फर्नेंद्र कुतीरकर, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापन प्राधिकरण कृष्णा रेड्डी उपस्थित होते.

गावकऱ्यांशी साधला संवाद

जिल्हास्तरी अधिकाऱ्यांनी यावेळी पूर आलेल्या भागात भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासन आपल्या पाठिशी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलासा दिला. तसेच तातडीने आवश्यक मदत दिली जाईल असा शब्द दिला. यावेळी त्यांनी काही घरांची पाहणी केली. निवारा गृहात पुरविण्यात येत असलेल्या सोयीसुविधांची माहितीही जाणून घेतली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना पानी पीताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.